शैक्षणिक टिप्स : अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यापूर्वी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Education

बारावीची परीक्षा झाल्याबरोबर पाल्यासह पालकांनाही अभियांत्रिकीसाठी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, याची चिंता लागलेली असते. त्यासाठी लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी.

शैक्षणिक टिप्स : अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यापूर्वी...

बारावीची परीक्षा झाल्याबरोबर पाल्यासह पालकांनाही अभियांत्रिकीसाठी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, याची चिंता लागलेली असते. त्यासाठी लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी.

  • प्रवेशप्रक्रिया : अनेकदा पालकांना व विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रवेशप्रक्रिया माहीत नसते. सर्वप्रथम ती माहिती करून घेणे गरजेचे असते. सद्यःस्थितीत अनेक महाविद्यालयांचे अभिमत विद्यापीठात रूपांतर झालेले आहे. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेचे निकषही बदललेले असतात. त्याची योग्य चौकशी करणे आवश्यक आहे.

  • अभ्यासक्रम : प्रवेशासाठी ज्या महाविद्यालयात नंबर लागला आहे, त्यामधील अभ्यासक्रमाचा विचार करावा. आपल्याला आवडीचे विषय त्या महाविद्यालयात उपलब्ध आहेत का, हे लक्षात घ्या. विषय निवडत असताना भविष्याचा वेध घ्या. कारण शिक्षण पूर्ण होत असताना त्या विषयाचे महत्त्व राहणार आहे की नाही याचा अंदाज घ्या. त्यामुळे नोकरी करणे किंवा व्यवसाय करताना अडचण यायला नको. आपण निवडलेल्या महाविद्यालयातील अभ्यासक्रम अद्ययावत असल्याची खात्री करा.

  • अनुभवी शिक्षक : महाविद्यालयात अनुभवी शिक्षक असणे ही जमेची बाजू असते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या शंकाचे ते योग्य पद्धतीने निरसन करू शकतात. त्याचबरोबर अभ्यासासाठी विषय निवडण्याबरोबर करिअरबाबतही मार्गदर्शन मिळते.

  • औद्योगिक प्रशिक्षण : औद्योगिक प्रशिक्षण हा अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे कोणत्या पद्धतीचे आणि किती काळासाठी औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते याची काटेकोर माहिती असणे क्रमप्राप्त आहे. योग्य कालावधीचे औद्योगिक प्रशिक्षण असल्यास विद्यार्थ्यांना चांगला अनुभव मिळतो. साधारणतः हा कालावधी तीन ते सहा महिन्याचा असावा.

  • प्लेसमेंट विभाग : महाविद्यालयातील महत्त्वाचा विभाग म्हणून याची दखल घेतली जाते. अभ्यासक्रमाबरोबरच प्लेसमेंटची माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. या विभागाचे काम हे प्रथम वर्षापासूनच असावे. कॅम्पसमध्ये मुलांना नोकरी देण्यासाठी येणार असलेल्या कंपन्यांना लागणाऱ्या सर्वच गोष्टी अभ्यासक्रमात असतील असे नाही. अशावेळी त्या लागणाऱ्या गोष्टी प्लेसमेंट विभागामार्फत पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

  • अभ्यास दौरा : विद्यार्थ्याला ४ वर्षांच्या अभ्यासक्रमात विविध कंपन्यांत अभ्यास दौरे काढणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे कंपनीत कोणकोणत्या विभागात कसे काम चालते, कंपनी काय काम करते, याची माहिती शिक्षण घेतानाच मिळण्यास मदत होते.

  • परकीय भाषा : आताच्या काळात विदेशातही नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने महाविद्यालयात कोणकोणत्या परकीय भाषा शिकविल्या जातात याची विद्यार्थ्यांनी खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. आपण निवडलेला अभ्यासक्रमाला पूरक अशी परकीय भाषा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

प्रवेश घेण्यापूर्वी या सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती करून घेणे आवश्यक आहे. आपली आवड, करिअरचे क्षेत्र आणि त्याला पूरक असलेल्या गोष्टी उपलब्ध असाव्यात. त्याची शॉर्टलिस्ट विद्यार्थ्यांनी करावी. म्हणजे ऐनवेळी अडचण येणार नाही.