आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सला भविष्यात येणार डिमांड!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

चांद्रयान हा रोबो होता, ज्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तेथील वातावरण आणि भूभागाबद्दल निर्णय घेऊन उतरणे अपेक्षित होते. चालकाविना चालणारी कार हे दुसरे उदाहरण आहे, जिथे रोबोटिक्स आणि एआयचा मिलाफ दिसून येतो.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि यंत्रमानव (रोबोट) : इंजिनीरिंग क्षेत्रातील उपयुक्त व रोजगाराभिमुख झंझावात  (भाग- २)

मागील भागात आपण मुख्यतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यंत्रमानव (रोबो) काय आहे, त्याचे कार्य कसे चालते, दैनंदिन जीवनात त्याचा कसा उपयोग होतो इ. बाबींची चर्चा केली. आता आपण या तंत्रज्ञानाचा औद्योगिक वापर कुठे होतो, आर्थिक उलाढालीमध्ये त्याचा वाटा किती, या उदयोन्मुख क्षेत्रात रोजगाराच्या संधी कशा आहेत आणि शेवटी त्या क्षेत्रात प्राविण्य कसे मिळवावे, हे पाहूया!

एआय आणि रोबोटिक्स : औद्योगिक वापर

चांद्रयान हा रोबो होता, ज्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तेथील वातावरण आणि भूभागाबद्दल निर्णय घेऊन उतरणे अपेक्षित होते. चालकाविना चालणारी कार हे दुसरे उदाहरण आहे, जिथे रोबोटिक्स आणि एआयचा मिलाफ दिसून येतो. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रोबोटिक ड्रायव्हिंग मानवी चालकाप्रमाणे रस्त्यांवरील असामान्य स्थितीत निर्णय घेण्याची क्षमता देऊ शकते. यात रोबोटिक व्हिजन रस्त्यावरील स्थितीची (खड्डे, सिग्नल, ट्रॅफिक, ऍक्सिडंट) माहिती घेईल. तसेच गुगल मॅपच्या मदतीने यांत्रिक ड्रायव्हिंगमध्ये विशिष्ट परिस्थितीत पर्यायी रस्ते (प्रवाशांना सूचना देऊन) वापरू शकेल.

कोण आहेत नवं शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन?​

कारखान्यांमध्ये अवजड कामे अचूकपणे, कमी खर्चात आणि मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी तर रोबोटिक्स वापरले जातेच. पण असे काही धोकादायक क्षेत्रे आहेत जेथे मनुष्याला काम करणे अशक्य आहे. जसे खाणकामात निदान सुरवातीचा काळ, अतिशय प्रतिकूल नैसर्गिक वातावरण, किरणोत्सारी भाग, जंगल, अंतरीक्ष इत्यादी. रोबोमध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात, शत्रूच्या गोटात हेरगिरी ते वैद्यकीय क्षेत्रातील अवघड शस्त्रक्रिया!

आपल्या कृषिप्रधान देशांत शेतीमध्ये या तंत्रज्ञानाला भरपूर वाव आहे. यात शेतीमालाची सुरक्षा, मालसाठ्याचे व्यवस्थापन, पुरवठा, रोगांची पाहणी, फवारणी, पीक-व्यवस्थापन, वातावरणाचे अंदाज, अवजारांच्या दुरुस्तीची पूर्वकल्पना आदी गोष्टी  असू शकतील.

तंत्रज्ञानाचा जागतिक बाजारपेठेतील वाटा

'एआय'चा जागतिक बाजारपेठेतील २०१९ या वर्षातील वाटा ३९.९ बिलियन डॉलर होता आणि २०२० ते २०२७ या काळात त्यात ४२.२ टक्के वृद्धी अपेक्षित आहे. मग रोबोटिक्सची आकडेवारी काय सांगते, तर रोबोटिक्सचा अर्थकारणातला आजचाच वाटा भव्य आहे. वाहन उद्योगातील रोबोटिक्सचा वापर २२ टक्क्यांनी वाढलेला आहे.

देशांतर्गत वापरासोबतच आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराच्या करारान्वये आपण जगात कुठेही आपले उत्पादन निर्यात करू शकतो. तेव्हा एआय, रोबोटिक्सवर आधारित लहान वस्तू ते भव्य प्रणालीचे उत्पादन यात आपल्या अभियंत्यांना अनेक सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय पातळीवरसुद्धा या क्षेत्रातील नफ्याचे भागीदार होण्यासाठी आणि आयात कमीत कमी करून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलली जाताहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टिंग झालेल्या टीना डाबी ठरल्या पहिल्याच IAS​

या क्षेत्रात प्राविण्य कसे मिळवाल?
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित काही मुक्त अभ्यासक्रम येताहेत, पण अशा ठराविक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम करण्यात दीर्घकालीन संधी मिळण्याचा धोका नेहमीच असतो. तेव्हा या तंत्रज्ञानासोबत पायाभूत तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन (ई अँड टीसी), आयटी, कॉम्प्युटर या शाखांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश आहे. रोबो पार्टसाठी मेकॅनिकल शाखेत डिझाईन आणि ई अँड टी.सी. शाखेत मेकॅट्रॉनिक्ससारख्या आंतरशाखा विषयातून ज्ञान प्राप्त होते. रोबोटिक ऑटोमेशन मधील प्रोग्रामिंगसाठी पीएलसी, एचएमआय, स्काडा याचा खोल अभ्यास ई.अँड टी.सी., इलेक्ट्रिकल या शाखेत केला जातो.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस (मूक) हे व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यात कोर्सेरा (www.coursera.org), Udemy (www.udemy.com ) NPTEL ही काही उदाहरणे आहेत. मानवी संसाधन विकास मंत्रालयाचासुद्धा इंडस्ट्रीच्या सहयोगाने अशा उपक्रमात सिंहाचा वाटा आहे. SWAYAM, NDL, e-PG Pathshala, NEAT, Vidwan ही काही उदाहरणे देता येतील. त्यातील बरेचसे कोर्सेस विनामूल्य आहेत.                      

नवीन तंत्रज्ञानाबद्दल विध्यार्थ्यांना सजग करणे, प्रोत्साहित करणे व मार्गदर्शन करणे यात विद्यालयाचा वाटाही मोलाचा असतो. 
आधुनिक तंत्रज्ञान हे मानवाने मानवाच्या प्रगतीसाठी निर्माण केले आहे. तेंव्हा त्याचा बाऊ न करता ते आत्मसात करण्याचा संकल्प करूया!                                      
- डॉ. विजय सरदार (जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, हडपसर)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Articles on Industrial Uses and Employment Opportunities in Artificial Intelligence and Robotics