esakal | ‘एमएचटी-सीईटी’ला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

-Exams-.jpg

‘एमएचटी-सीईटी’ला सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील जवळपास सव्वाचार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणारी ही परीक्षा १ ऑक्टोबरपर्यंत विविध सत्रांत होणार आहे.

ही परीक्षा संगणकीकृत असून त्यासाठी तीन तासांचा कालावधी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करून ही परीक्षा घेण्यात येत आहे. या वर्षी या परीक्षेसाठी चार लाख २४ हजार ७७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेतील ‘पीसीएम’ ग्रुपसाठी दोन लाख २८ हजार ४८५ विद्यार्थ्यांनी, तर ‘पीसीबी’ ग्रुपसाठी दोन लाख ७७ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्यातील दोनशेहून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. यासाठी राज्यभरात ५० हजारांहून अधिक संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेत ‘पीसीबी’ ग्रुपमधून प्रवेश परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश पत्र (हॉल तिकीट) मिळाले नसल्याची तक्रार केली आहे.

हेही वाचा: पवार सेनेचे नेते नाहीत, गितेंच्या वक्तव्यावर राऊत म्हणतात...

...तर परीक्षेची तारीख मिळणार

‘सीईटी’ परीक्षेच्या दिवशी बारावीची पुरवणी परीक्षेसह अन्य परीक्षा असल्यास अशा विद्यार्थ्यांच्या ‘सीईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मागील आठवड्यात ट्विटरद्वारे दिली होती. त्याप्रमाणे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र, मोबाईल क्रमांकासह सीईटी कक्षाच्या technical.cetcell@gmail.com या ई-मेलवर संबंधित बदलाबाबत ई-मेल करावा, असेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

पीसीएम ग्रुप २,२८,४८५

पीसीबी ग्रुप २,७७,३०२

एकूण ४,२४,७७३

loading image
go to top