वर्तनशैली व तिचे परिणाम

जंगलाच्या मध्यभागी एक छोटासा ओढा होता. कुबा नावाच्या सापाने त्या ओढ्याचे थोडा वेळ निरीक्षण केले आणि तो अचानक जोरात ओरडला, ‘‘टोबी दूर जा, ही माझी जागा आहे!’
Behavior and its consequences Observation
Behavior and its consequences ObservationSakal

- प्रांजल गुंदेशा

जंगलाच्या मध्यभागी एक छोटासा ओढा होता. कुबा नावाच्या सापाने त्या ओढ्याचे थोडा वेळ निरीक्षण केले आणि तो अचानक जोरात ओरडला, ‘‘टोबी दूर जा, ही माझी जागा आहे!’’ गरीब, बिचारे टोबी कासव तहानलेले होते, पण कुबाचा राग पाहून त्याने माघार घेतली व माफीही मागितली.

तेवढ्यात ऑली-वृद्ध घुबड-तिथे आले आणि त्याने मोठ्या आवाजात विचारलं, ‘‘कुबा, तू टोबीवर दादागिरी का करतो आहेस?’’ त्याच्या आवाजात ठामपणा होता. त्यावर कुबा कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, ‘‘हेच माझे स्पष्टीकरण आहे!’’

आजूबाजूला असलेले अनेक प्राणी कुबाला नापसंत करत होते, पण भांडण टाळण्यासाठी कोणीही काहीही बोलत नव्हतं. ऑली ठामपणे म्हणाला, ‘‘कुबा, ओढा व जंगल सर्वांचे आहे. आपल्या सर्वांसाठीच ही पुरेशी जागा आहे.’’ तो कुबाच्या समोरच्या फांदीवर बसला. त्याच्या चेहऱ्यावर ठामपणा होता, निश्‍चय होता.

ऑली घुबडाच्या या पावित्र्यामुळे कुबा थोडा बिचकला. मात्र, लगेच त्याने वार करण्याची धमकी देऊन आपला फणा उगारला. त्यावरही ऑलीने स्वतःची नजर व आवाज स्थिर ठेवला. तो ठाम आवाजात म्हणाला, ‘‘आम्ही सर्व जण अतिशय शांतपणे ही जागा वापरू शकतो. त्यासाठी कोणीही कोणावरही आक्रमण करण्याची गरज नाही.’’ ऑलीचे हे वागणे पाहून कुबा वरमला. त्याने माघार घेतली. आपला फणा खाली केला व तो ‘बरं, ठीक आहे!’ असे म्हणून निघून गेला.

वर्तनशैली

वरील कथेतील तीन प्राणी तीन वेगवेगळ्या वर्तनशैलींचे प्रतिनिधित्व करतात.

 • निष्क्रियता : कासवाचा स्वभाव निष्क्रिय आहे. त्यामुळे तुम्ही इतरांची मते आणि अधिकार जपण्याचा प्रयत्न करता. यामुळे तुम्ही नातेसंबंधांमधील संघर्ष टाळू शकता, परंतु त्यामुळे तुम्हाला दडपल्यासारखे वाटते. तुमचे मत बिनमहत्त्वाचे ठरते किंवा त्यात अस्पष्टता जाणवते. त्यामुळे तुम्हाला निर्णयही घेता येत नाहीत.

 • संभाव्य परिणाम : आत्मसन्मान कमी मिळतो. सतत मनात कमीपणाची भावना. कोणालाही नाही म्हणणे कठीण होते. कामाचा ताण वाढतो आणि कोणताही आनंद मिळत नाही.

 • आक्रमकता : साप स्वभावाने आक्रमक आहे. तिथे संवादशैली ठाम असते. तुम्ही तुमच्या हक्कांसाठी उभे राहता, पण त्याच वेळी इतरांच्या हक्कांचे उल्लंघनही करता. आपणच श्रेष्ठ असल्याची खोटी भावना तुमच्यात वाढत जाते. तुमचे मुद्दे मांडून वाद घालता. यामुळे कदाचित तुम्ही जिंकता, पण इतरांचा अनादर होतो आणि नातेसंबंध खराब होतात.

 • संभाव्य परिणाम : लोक तुमच्याबद्दल राग आणि भीती व्यक्त करतात. तुमचा अनादरही करतात. त्यामुळे लोक तुमच्याशी फारसा व्यवहार करत नाहीत आणि तुम्हीही आनंदी राहत नाही.

 • ठामपणा : घुबड स्वभावाने ठाम आणि खंबीर आहे. त्यामुळे ते इतरांचा आदर राखून त्यांच्या हक्कांसाठी लढते आहे. समानता आणि परस्परआदराची भावना त्याच्या मनात आहे. असे लोक सामान्यतः आपला आवाज शांत, पण ठाम ठेवतात आणि आपले मुद्दे मांडतात.

 • संभाव्य परिणाम : स्वत:ची किंमत चांगली होते आणि आत्मसन्मानाची भावना वाढते. सर्वांकडून प्रशंसा होते. आदर मिळतो. नातेसंबंध वाढीस लागतात. खंबीरपणा ही संवाद आणि वर्तणुकीची महत्त्वपूर्ण शैली असून, ती सकारात्मक, दृढ, आदरयुक्त आणि स्पष्ट आहे. त्यामुळे या शैलीचा अंगिकार केल्यास चांगलाच परिणाम होतो.

आपल्या कामाचे ठिकाण, शाळा आणि घरामध्येही उत्कृष्ट सदस्य किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती होण्यासाठीचे आवश्‍यक कौशल्य म्हणजे, आपल्या संवादामध्ये ठामपणा आणणे. अर्थात, ठाम असण्यामध्ये खालील गोष्टीदेखील समाविष्ट असतात. जसे की,

 • इच्छा, विचार आणि भावना व्यक्त करण्यात मोकळेपणा ठेवणे, न घाबरणे आणि इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित करणे.

 • इतरांची मते ऐकणे. आपण त्यांच्या मताशी सहमत असो किंवा नसो, त्यांना योग्य तो प्रतिसाद देणे.

 • जबाबदाऱ्या स्वीकारणे आणि इतरांकडून कामे करून घेण्यात सक्षम असणे.

 • इतरांचे न विसरता कौतुक करणे.

 • आपल्या चुका मान्य करणे आणि माफी मागणे.

 • आदरयुक्त आणि सकारात्मक शब्द वापरणे.

 • इतरांशी बरोबरीने वागणे.

खंबीर राहणे, वागण्यात ठामपणा आणणे हे आत्मसात करता येण्याजोगे कौशल्य आहे. त्यामुळे निश्‍चितच जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करता येते. तुम्हालाही वरील गोष्टीतील घुबडासारखे हुशार व्हायचे असेल, तर तुम्हीही या कौशल्याला आत्मसात करा.

या पुढील लेखात आपण कठीण परिस्थितीत ठामपणे कसे बोलावे? याबाबत जाणून घेऊ. अशा पद्धतीची विविध माहिती व प्रात्याक्षिके पाहण्यासाठी pranjal_gundesha या इंस्टाग्राम पेजला आणि TheIntelligencePlus या यू-ट्यूब चॅनेलला फॉलो करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com