

सध्या डेटा हा शब्द अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे. आपण स्वतः वैयक्तिक आयुष्यात अनेक प्रकारची माहिती गोळा करत असतो. तसेच, दिवसातून अनेक वेळा आपण आपली माहिती सार्वजनिक करत असतो. घरातील अनेक साहित्य ऑटोमेटेड झाल्यामुळे आपली सर्व माहिती आपण आपल्या नकळत बाहेरील लोकांना देत असतो. खरेदीचे प्राधान्य, आरोग्याची माहिती, फिरलेली ठिकाणे, विकत घेतलेले साहित्य आणि आर्थिक परिस्थिती इत्यादी सर्व माहिती आपण देत असतो. ह्या माहितीचा उपयोग हुशार भांडवलदार करत असतात.
तुम्ही जर कर्मचारी असाल, तर अशा प्रकारच्या अनेक माहितींचा वापर तुम्हाला करावा लागतो. बाजारातील स्पर्धेची माहिती, सरकारच्या योजना आणि त्यांचा उद्योगावर परिणाम, लोकांचे आणि संस्थांचे साहित्य, मशिन्स वगैरे खरेदी करण्याच्या पद्धती आणि बरेच काही माहिती गोळा होते अथवा करावी लागते. तसेच संस्थेमध्ये तयार होणारी माहिती अमाप असते. अशा प्रकारे ‘बिग डेटा’ म्हणून तुफानी माहिती साठवली जाते. हा डेटा गोळा करण्यासाठी आणि सांभाळायची संस्थेच्या प्रणाली आणि प्रक्रिया असतात. ह्या माहितीचा आणि डेटाचा उपयोग करायचा कसा? त्या डेटाचा अभ्यास करून आपले काम कसे साध्य करायचे आणि ह्या डेटाचा उपयोग संस्थेच्या फायद्यासाठी कसा करून घ्यायचा? हे महत्त्वाचे प्रश्न कर्मचारी म्हणून निर्माण होतात. हे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर तुम्ही योग्य मार्गावर आहेत असे म्हणावे लागेल.
असा वापरा डेटा
काम करत असताना हा डेटा तुमच्या चतुरतेमध्ये कसा परावर्तित करता, हे बदलत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. ह्या सर्व डेटाचा प्रभाव आपल्या कामावर पडतो आहे. एखादी घटना विश्लेषित करण्याचे कौशल्य म्हणून एव्हरग्रीन स्किल आहे. ह्याचा उपयोग आपल्याला करावा लागेल. वैयक्तिक विकासाच्या प्लॅनमध्ये हे कौशल्य शिकण्याचे आताच ठरवून टाका. ह्या कौशल्याचा उपयोग तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात निश्चितच होईल. कर्मचारी म्हणून सर्वप्रथम हे सर्व प्रकरण, ‘डेटा, माहिती, ज्ञान आणि चतुरता’ ह्या चढत्या क्रमाने समजून घ्यावे लागेल.उपलब्ध असणारा डेटा, योग्य पद्धतीने आणि पद्धतशीरपणे मांडणे ही पहिली पायरी आहे. उदा. तुमच्या शंभर ग्राहकांचा डेटा विस्कळीतपणे तुमच्याकडे आला. आता ह्या डेटा तसा काही उपयोगाचा नाही. हा डेटा वेगवेगळ्या टेबलमध्ये, चार्टमध्ये पद्धतशीरपणे समजू शकेल असा मांडता आला पाहिजे. त्यासाठी योग्य त्या प्रणालीचा उपयोग करता येणे गरजेचे ठरते.
डेटा आणि त्याचा अर्थ
आता हा सर्व डेटा तुम्ही माहितीमध्ये रूपांतरित केला. त्या माहितीवरून तुम्हाला तुमच्या ग्राहकांबद्दल अधिक समजू शकेल. परंतु हे पुरेसे नाही. ह्या माहितीचा उपयोग काय? त्याचा अर्थ काय? ग्राहकांबद्दल काही काही निष्कर्ष आपल्याला काढता येईल का? अर्थात, काही प्रमाणात, पण संपूर्णपणे नाही. ही माहिती का, कशी, केव्हा आणि कशासाठी वापरता येईल, ह्याचे विश्लेषण करता आले पाहिजे, बॉसला आणि वरिष्ठ व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी उपयोगी होईल हे बघता आले पाहिजे. ही झाली दुसरी पायरी. आणि शेवटी ह्या विश्लेषणाचा उपयोग भविष्यासाठी करता येईल का? एखादे भविष्य सांगणारे मॉडेल तयार करता येईल का? हे समजून घेणे म्हणजे चतुरता. उदा. संस्थेतील एका विशिष्ट विभागातील कर्मचारी सोडून जात असतील तर त्याचा अभ्यास करून, ते कर्मचारी कोणत्या घटकामुळे सोडून गेलेत आणि त्या बदलते घटकांचा उपयोग करून भविष्यात कोणते कर्मचारी संस्था सोडून जाऊ शकतात हे सांगणे म्हणजे शेवटची पायरी.
हे सर्व करत असताना ॲडव्हान्स एक्सेल, मिनी टॅब, पॉवर बीआई इत्यादी प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण घेणे आणि हे सर्व ग्राफिकली प्रेझेंट करता येणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पदावर, कोणत्याही वयाचे असलात, तरी ह्या कोर्सेसला नक्की प्रवेश घ्या. शेवटी डेटा वापरून तुम्हाला प्रभावित करण्यासाठी डेटा स्टोरीज सांगता आल्या पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.