
SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षेसाठी मोठा निर्णय : दहा मिनिट अगोदर पेपर देण्याची सवलत बंद
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिट अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यास देण्याची सवलत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात पेपरफुटीच्या तसेच प्रश्नपत्रिका व्हाट्सअप आणि इतर माध्यमातून व्हायरल होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्यात यासाठी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला शिक्षण आयुक्त, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, विभागीय जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त,जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात राबवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना यापूर्वी दहा मिनिट अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जात होती. ती सवलत आता रद्द केली जाणार आहे. तर दुसरीकडे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील महसूल, महिला बालविकास, ग्रामविकास आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांची ही मदत घेतली जाणार आहे.
सोबतच जिल्हाधिकारी आणि विशेष कार्यकारी अधिकारी आपापल्या विभागात पत्रकार परिषदा आयोजित करून कॉपीमुक्त अभियानासंदर्भातील माहिती सर्वसामान्य नागरिक आणि शाळा संस्थाचालक यांना देणार आहेत. त्याचाही निर्णय घेण्यात आला असून त्याचा फायदा कॉपीमुक्त अभियानाला होईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.