करिअर मार्गदर्शनाचे महत्त्व

कलचाचणी दिल्यानंतर पुढील पायरी म्हणजे त्या चाचणीचे अचूक विश्लेषण करून योग्य करिअरची दिशा ठरवणे.
counselling
counsellingsakal
Updated on

- रिना भुतडा, करिअर समुपदेशक

कलचाचणी दिल्यानंतर पुढील पायरी म्हणजे त्या चाचणीचे अचूक विश्लेषण करून योग्य करिअरची दिशा ठरवणे. याच ठिकाणी करिअर समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची ठरते. ॲप्टिट्यूड टेस्टचे निष्कर्ष आणि शारीरिक, मानसिक, कौटुंबिक पार्श्वभूमी व आर्थिक स्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेण्यासाठी समुपदेशक मार्गदर्शन करतात.

समुपदेशकाच्या जबाबदाऱ्या

विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे समजून घेणे

विद्यार्थ्याच्या आवडी-निवडी, स्वप्ने आणि पालकांच्या अपेक्षा समजून घेतात. दोघांमधील दरी कमी करून योग्य पर्याय सुचवणे हे त्यांचे प्रमुख कार्य असते.

कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभ्यास

शिक्षण, व्यवसाय आणि आर्थिक परिस्थिती या दृष्टीने कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक असते. काही करिअर निवडींमध्ये पैसा व वेळेच्या मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते, तर काही क्षेत्रांसाठी कुटुंबातील पारंपरिक व्यवसाय किंवा अनुभव उपयुक्त ठरू शकतो.

विद्यार्थ्याच्या क्षमता आणि अभ्यास पद्धती समजून घेणे

क्षमता, अभ्यासाची गती आणि जिज्ञासू वृत्ती याचा विचार करून योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते. विद्यार्थ्याच्या नैसर्गिक कौशल्यांवर आधारित करिअरची शिफारस करणे हे समुपदेशकाचे महत्त्वाचे काम असते.

स्मार्ट कनेक्शन करणे

चांगला समुपदेशक विविध घटकांमध्ये योग्य संबंध जोडतो. विद्यार्थ्याच्या क्षमता आणि आवडीनुसार त्याला योग्य दिशा देतो आणि कमकुवत बाजूंवर काम करण्यास मदत करतो.

अद्ययावत माहिती असणे

पारंपरिक करिअरच्या व्यतिरिक्त अनेक नवीन क्षेत्रे उदयास आली आहेत. त्यामुळे एक सक्षम समुपदेशकाकडे प्रत्येक क्षेत्राबाबत अद्ययावत माहिती असते. केवळ करिअर सल्ला न देता, प्रवेश प्रक्रिया, त्यातील स्पर्धा, बोर्ड निवड, परीक्षेच्या तयारीची रणनीती, कोचिंग सुविधा, नामांकित महाविद्यालये, कोर्सेस, कट-ऑफ, आणि भविष्यातील संधी याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणे गरजेचे असते. प्लॅन ए, बी, सी ची आखणी करणे तितकेच महत्त्वाचे असते. शिवाय कोरोनानंतर विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वाढलेला अतिवापर, यूट्यूब, ऑनलाइन साधनांचा वापर या समस्यांवर ‘जेन-झी’ला उपाय सुचविण्याचे नवीन काम समुपदेशकाला करावे लागते.

कल्पना करा की एक हत्ती, ससा आणि मासा एखाद्या तळ्याची खोली मोजायचा प्रयत्न करतात. मासा सहज पोहतो, सशाला अडचण येते, तर हत्तीला पाणी उथळ वाटते. याचा अर्थ स्पष्ट आहे, प्रत्येकजण वेगळ्या क्षमतांसह जन्माला येतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नैसर्गिक क्षमता आणि आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे गुणांच्या आधारे निर्णय घेण्याऐवजी पालक आणि विद्यार्थी यांनी समुपदेशकाच्या मार्गदर्शनाने खुली चर्चा करावी. योग्य करिअर निवडीसाठी सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

प्रत्येक विद्यार्थ्याची करिअर यात्रा वेगळी असते, त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. ॲप्टिट्यूड चाचणी विद्यार्थ्याची दिशा ठरविण्यास मदत करते, परंतु योग्य निर्णय घेण्यासाठी करिअर समुपदेशक अपरिहार्य ठरते. चांगला समुपदेशक ही संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित समजावून घेतो, सर्व पैलूंचे बारकाईने विश्लेषण करतो आणि विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com