- प्रा. शरद मनसुख
साधारणपणे कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक विद्या शाखांमध्ये करिअर करण्यासाठी खूप संधी असते. मात्र, समाजात विशेषतः पालकवर्गामध्ये पूर्वीपासून प्रत्येक शाखेविषयीची माहिती फारशी नसल्याने ते एकाच पद्धतीचा विचार करतात. त्यामुळे करिअरच्या अनेक नव्या वाटा दिसत नाहीत. करिअर म्हणजे बुद्धिमान व कौशल्यवान व्यक्ती बनून आपल्या आवडी व बाजारपेठेच्या गरजांचा अंदाज घेऊन आपली सर्वोत्तम क्षमता सिद्ध करणे होय.
स्पर्धा परीक्षा
दहावीनंतर कला शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बारावी, तसेच बीए झाल्यावर विविध क्षेत्रांत कला शाखेतील विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षेची आवड असणारे विद्यार्थी हे पोलिस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर अधिकारी (STI), मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार, शिक्षणाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांसाठी प्रयत्न करू शकतात.
तसेच ‘यूपीएससी’द्वारे IAS, IPS, IFS आणि अन्य भारतीय केंद्रीय सेवेची निवड करू शकतात. तसेच स्वयंसेवा संस्थांमध्ये काम करू शकतात. याशिवाय खासगी क्षेत्र, निमशासकीय क्षेत्र, मानव अधिकार क्षेत्रातही विविध संधी आहेत. समाजसेवेची मनापासून आवड असणारे उमेदवार BSW/MSW यांसारखे विविध कोर्स करून व पदवी घेऊन शासकीय व निमशासकिय क्षेत्र, खासगी क्षेत्रात काम करू शकतात.
महाराष्ट्र व भारत सरकारमार्फत विविध विभागांतून सरळसेवा भरतीद्वारे आर्मी, पोलिस, अग्निशामक दल, BSF/SRPF/CRPF/NDRF या विभागात काम करण्याची संधी हे विद्यार्थी प्राप्त करू शकतात. ग्रामीण भागाशी निगडित असणारी विविध शासकीय पदे आहेत. यात ग्रामसेवक, तलाठी, कृषिसेवक, वनरक्षक, पाटबंधारे, समाजकल्याण विभाग इत्यादी विभाग आहेत.
प्राध्यापक, वकील, पत्रकार
कला शाखेचे विद्यार्थी प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजेच वर्तमानपत्रे किंवा म्हणजे टी.व्ही., रेडिओ, एफएम यासाठी पत्रकार किंवा निवेदक म्हणून काम करू शकतात. राजकीय, आर्थिक, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील पत्रकार म्हणून काम करता येते. LLB किंवा LLM ची पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन वकिली क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू शकता व न्यायाधीश पदापर्यंत पोहचू शकता.
खासगी क्षेत्रात कायदेशीर सल्लागार म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात अर्थात शिक्षणक्षेत्रात प्राथमिक शिक्षकासाठी बारावीनंतर डी.एड. आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी बी. एड. करता येते. महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी सेट व नेट या राज्य व राष्ट्रीय पात्रता परीक्षा पास होऊन किंवा पीएच.डी. प्राप्त करून उत्तम करिअर करता येते.
भाषातज्ज्ञ, अनुवादक, लेखक
केंद्र शासनाच्या परराष्ट्र खात्यांमध्ये भाषातज्ज्ञ, परकीय भाषातज्ज्ञ, भाषा अनुवादक म्हणून कार्य करण्याची संधी आहे. विशेषतः मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व निरीक्षण, कल्पनाविस्तार यांची आवड असलेल्या नवोदित लेखकांना कथा, पटकथा, संवाद, लेखक, विनोदी लेखक व दैनंदिन मालिका, चित्रपट व वेबसीरिज, ओटीटीमध्ये लेखनाच्या अनेक संधी या डिजिटल युगात नव्याने उपलब्ध झालेल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात खास करून जाहिरात लेखक, सल्लागार, संकल्पनातज्ज्ञ, प्रकल्प सहाय्यक, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये अशा विविध संधी उपलब्ध आहेत.
कला, पर्यटन
चित्रकलेची आवड असणाऱ्या उमेदवारांना BFA, MFA, फाइन आर्ट, ॲनिमेशन, ग्राफिक्स, व्यंग्यचित्रकार म्हणून उत्तम संधी आहे. आजच्या युगात पर्यटनास असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गाइड किंवा ट्रॅव्हल्स ॲण्ड टूर्स क्षेत्रात विविध संधी आहेत. हजारो वर्षांची परंपरा व इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रात व भारतात पुरातत्त्वशास्त्र व विभागात इतिहास संशोधक म्हणूनही करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत.
राज्यशास्त्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेबरोबरच पॉलिटिकल सायंटिस्ट व राजकीय समालोचक, सर्व्हे कंडक्टर, राजकीय विश्लेषक, राजकीय पत्रकार यांसाठी करिअर उपलब्ध आहेत. मानसशास्त्र विषय घेऊन चाइल्ड सायकॉलॉजी, क्रिमिनल सायकॉलॉजी, समुपदेशक यात काम करता येते. विमाक्षेत्रात शासकीय व खासगी क्षेत्रात विमा सल्लागार, एजंट आणि विकास अधिकारी म्हणूनही करिअर करता येतं.
करिअर निवडीसाठी तीन घटक आवश्यक असतात. प्रथम महत्त्वाचा घटक म्हणजे आवड होय. आवड असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात उत्तम कार्य करू शकता. दुसरा घटक म्हणजे क्षमता. एखाद्या पदासाठी किंवा क्षेत्रासाठी कार्य करण्याची सर्वोत्तम क्षमता आपल्यामध्ये असणे फार गरजेचे आहे. तिसरा घटक म्हणजे, पात्रता. कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करण्यासाठी आवश्यक असते ती पात्रता.
वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी व करिअरसाठी पात्रता हा अत्यंत महत्त्वाचा निकष मानला जातो. उमेदवारांनी नियमानुसार पात्रता पूर्ण केली, तरच तो निश्चित ध्येय गाठू शकतो. ते पद प्राप्त करू शकतो. या सर्व बाबींचा विचार करून कला क्षेत्राकडे पाहायला हवे. या क्षेत्रात भरपूर संधी निश्चितच आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.