डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा | Educational News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 परीक्षा
डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट पूर्णपणे आटोक्‍यात आली आहे. राज्यातील 19 जिल्हे कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University), पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) बहुतांश विद्यापीठांनी डिसेंबर-जानेवारीत होणारी सत्र परीक्षा ऑफलाइनच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: 'PSI'ची वाढणार वयोमर्यादा? बुधवारी होणार कॅबिनेटमध्ये निर्णय

कोरोनामुळे अजूनपर्यंत महाविद्यालये उघडली नाहीत. ऑफलाइन कॉलेज सुरू करण्याचा निर्णय झाला, परंतु त्याला कोरोनावरील प्रतिबंधित लसीची अट घातल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येता आले नाही. राज्यातील जळगाव, नंदुरबार, धुळे, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. आता दिवाळी सुट्ट्यांनंतर महाविद्यालये नियमितपणे सुरू होणार आहेत. परीक्षेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व नागरी आरोग्य केंद्रांवर लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. दिवाळीनंतर कॉलेज सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी एक-दीड महिने ऑफलाइन पद्धतीने शिकवले जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीनेच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. ऑनलाइन परीक्षांमध्ये पारदर्शकता राहिली नसल्याचे प्रॉक्‍टरिंगमध्ये पाहायला मिळाले. पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकावेत, हा देखील हेतू विद्यापीठांनी ऑफलाइन परीक्षांमागे ठेवला आहे.

पुढील परीक्षा ऑफलाइनच

कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असून, प्रतिबंधित लसीकरणही युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठाची 15 डिसेंबरनंतर अथवा जानेवारीत होणारी पुढील सत्र परीक्षा ऑफलाइनच होईल.

- डॉ. महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे

हेही वाचा: B.Tech अन्‌ MBA उत्तीर्णांसाठी ITI लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी!

'ऑनलाईन'चा पर्याय पारदर्शक नाही

कोरोनाच्या दोन्ही लाटेत राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठाअंतर्गत साडेपाच हजार महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी मित्रांना, त्या विषयातील तज्ज्ञांना विचारून अथवा मोबाईलवरून उत्तरे लिहिली, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचेही मत काहींनी मांडले. तर आपले विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाहीत, अशी भीती विद्यापीठांना वाटू लागली आहे. त्यामुळे आगामी सत्र परीक्षा ऑफलाइन घ्यायला हरकत नाही, असे विद्यापीठांचे म्हणणे आहे. याबाबतीत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हे काय भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top