संवाद - प्रश्न विचारण्याची कला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 प्रश्नांचे वादळ महत्त्वाचे

संवाद - प्रश्न विचारण्याची कला

व्याख्यान झाल्यानंतर कुणाला काही प्रश्न आहेत का? असे विचारले की एक प्रकारे सन्नाटाच अनुभवायला येतो. प्रश्न नसतात याची कारणं दोन ‘सगळं समजलय म्हणून काहीच प्रश्न नाही’, ‘काहीच समजलं नाही म्हणून काहीच प्रश्न नाही’ असे सांगून एक विनोद ही केला जातो. परंतु मुलांकडून प्रश्नच येत नाहीत ही वास्तविकता आणि खंत मात्र आहे. प्रश्न पडले, ते विचारता आले, त्यांचे निरसन करून घेता आले तरच आपण शिकणार आणि प्रगती होणार. केवळ आपल्याला जे सांगितले, दाखवले जात आहे त्यावरच अंध विश्वास ठेऊन चालणार नाही. स्वतःच्या मनात उठणारे प्रश्नांचे वादळ महत्त्वाचे. मनात येणारे कोणतेही प्रश्न मग ते अगदी सामान्य का असेना विचारले मात्र जरूर पाहिजेत. नाहीतर हे छोटे वाटणारे प्रश्नच पुढे जाऊन मोठी समस्या उभी करतात. तर प्रश्न कसे विचारावेत ते समजून घेऊ या.

प्रश्न विचारू की नको अशी संभ्रमावस्था नसावी. आपल्याला समजलेच नाही म्हणून आपल्या प्रश्नाला कुणीतरी हसेल, आपली फजिती होईल अशा विचाराने प्रश्न दडवून ठेवणं चुकीचेच. त्यामुळे एकतर प्रश्न स्वतःचाच असावा. दुसऱ्या कुणालातरी वाटते तो प्रश्न आपण विचारून काय होणार? कारण आपण विचारत असणाऱ्या प्रश्नाची पार्श्वभूमी आपल्याला पूर्ण माहीत असते. इतरांच्या प्रश्नांच्या बाबतीत असे असेलच असे नाही.

अनेक जणांना प्रश्न विचारताना फिरवून फिरवून विचारण्याची सवय असते. म्हणजे प्रत्यक्षात काय विचारायचे आहे ते स्पष्ट नसते. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडण्याची शक्यता जास्त. त्यामुळे विचारायचा प्रश्न प्रत्यक्षपणे विचारावा तो स्पष्ट असावा. एकात एक असे दुहेरी प्रश्न नसावेत. म्हणजे एकाच वेळी अनेक प्रश्न एकमेकात गुंतलेले नसावेत. ते सुटे करून मांडले तर उत्तमच. त्यामुळेच शब्दांची रचनाही कमीत कमी शब्दात केलेली असावी. प्रश्न हा नेमकेपणाने शब्दबद्ध केलेला असावा. म्हणजे नक्की काय माहीत करून पाहिजे आहे ते समजायला मदत होते.

आपली प्रत्यक्षात समस्या काय आहे हे प्रश्नातून उलगडायला हवे. त्यामुळेच त्याचे उत्तर मिळवणे सोपे जाईल. प्रश्न विचारताना तो विधानार्थी नसावा, आपल्या समस्येचे योग्य त्या प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर केले आहे का ते पहाणे महत्त्वाचे. केवळ होय किंवा नाही असे उत्तर येणारे प्रश्न जास्त काहीच साध्य करत नसतात. त्यामुळे स्पष्टीकरण मिळवून देणारे प्रश्न महत्त्वाचे. ज्या प्रश्नांचे उत्तर अगदी सहज आहे असे कसोटी पाहणारे प्रश्न नसावेत तर आपण ज्याला प्रश्न विचारला आहे त्याला क्षणभर विचार करायला लावणारे असावेत. ज्यातून आपल्याला पुढील अभ्यासासाठी मार्गदर्शन मिळेल अशा स्वरूपाचे प्रश्न नक्कीच आपल्या ज्ञानात मोलाची भर घालतात.

सद्य भागावर, संदर्भातील विषयावर आधारित प्रश्न असावेत. समोर एक विषय चालला आहे आणि आपला प्रश्न मात्र जुन्याच भागावर असे करून चालणार नाही. प्रश्न हा समजेल अशा स्वरात आणि गतीने विचारावा. प्रश्न विचारणं ही कलाच आहे. अभ्यास, सराव करताना प्रश्नांचे महत्त्व जाणून घ्यावे. प्रश्न विचाराल तर उत्तर मिळेल, समस्या कथन केली तर उपाय सापडतील, शोध घेतलात तर सापडेल. बघा सुरुवात तुम्हाला करायची आहे.

डॉ. उमेश दे. प्रधान

Web Title: Communication Art Asking Questions Own Mind Is Important

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..