कोरोना आणि जपानी शहरांची अर्थव्यवस्था

सुजाता कोळेकर
Thursday, 15 October 2020

जपानमध्ये आधी छोट्या शहरांमध्ये व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेतच, ही योजना जे लोक टोकियोमधील जॉब छोट्या शहरांतून करतील त्यांच्यासाठी आणण्यात आली आहे. 

कोरोना इफेक्ट - जे लोक जपानमधील छोट्या शहरांमध्ये जाऊन काम करतील त्यांना जवळ जवळ १० लाख येन प्रतिमहिना पगार मिळेल!

जपानचे सरकार या गोष्टीवर विचार करत आहे. सगळे लोक शहरांकडे नोकरीसाठी ओढले जात असल्यामुळे जपानमध्ये बरीच छोटी शहरे रिकामी होत चालली आहेत. घरूनच काम करायचे आहे, तर मग या छोट्या शहरांच्या अर्थव्यवस्थेलाही काही फायदा होऊ शकेल का, याचा विचार करताना ही नवीन योजना येण्याची शक्यता आहे. 

सॉफ्टवेअर क्षेत्रातील लोकांना किंवा ज्यांचे काम घरातूनच होणे शक्य आहे, त्यांच्यासाठी ही योजना एप्रिल २०२१पासून सुरू होईल. जे लोक असे स्थलांतर करायला तयार होतील त्यांच्यासाठी सुरुवातीला सरकारकडून ३० लाख येन मिळतील. हे पैसे घरी काम करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी असतील. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जपानचे नवनियुक्त पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी छोट्या शहरांच्या पुनरुज्जीवन करण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी सुमारे १०० अब्ज येन रक्कम बाजूला ठेवली जाणार आहे. जपानमध्ये आधी छोट्या शहरांमध्ये व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेतच, ही योजना जे लोक टोकियोमधील जॉब छोट्या शहरांतून करतील त्यांच्यासाठी आणण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जी कामे टेलिफोन वरून होतात; उदाहरणार्थ बँकेच्या ग्राहकांना लागणारी माहिती, विमाधारकांना लागणारी माहिती, हॉटेल बुकिंग्ज, मोठ मोठ्या कंपन्यांना लागणारी सपोर्ट प्रणाली अशी कामे मागील काही महिन्यांत वाढली आहेत आणि ही कामे कोठूनही होऊ शकतात. जपानची जमेची बाजू म्हणजे सगळ्या पायाभूत सुविधा (हाय स्पीड इंटरनेटसह) अगदी खेड्यापाड्यांतही असल्यामुळे त्यांची ही कामे कोठूनही होऊ शकतात. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१५च्या सर्वेक्षणानुसार जपानच्या एकूण लोकसंख्येपैकी २९ टक्के लोकसंख्या टोकियोमध्ये राहते. जगातील इतर मोठ्या शहरांपेक्षा हे प्रमाण खूपच जास्त आहे. कोरोनाच्या काळात यातील ४० टक्के काम करणारे लोक छोट्या शहरात स्थलांतर करण्यास तयार आहेत, असे एका पाहणीमधून समजले. हे लोक अशा शहरांमध्ये गेल्यास त्या शहरांच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, यात शंकाच नाही. लोक वाढल्यावर त्या शहरातील शाळा, कॉलेज, दवाखाने, सिनेमागृहे इत्यादी बरेच व्यवसाय वृद्धिंगत होतील. याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही  होणारच.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जपान आणि संकटाचे  सोने  
मी जपानमध्ये राहत असताना एका मीटिंगमध्ये एक मुद्दा ऐकला होता ः जपानमधल्या सरकारी सुट्या शुक्रवारी किंवा सोमवारी असायच्या. मी आश्चर्यचकित होऊन माझ्या जपानी मैत्रिणीला विचारले, तेव्हा तिने सांगितले, तीन दिवस जोडून सुटी मिळाल्यास लोक फिरायला बाहेर पडतात आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. जपान सरकार बऱ्याच वेळा अशा जोडून सुट्या देते आणि त्याचबरोबर रस्त्यावरील टोलही माफ केला जातो, त्यामुळे लोकांना बाहेर पडायला अजून एक कारण मिळते. असा विचार केल्यामुळेच जपानच्या अर्थव्यवस्थेला वेळोवेळी गती मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona and the economy of Japanese cities