

आपल्या पाल्याने खूप शिकावे, नवनवीन गोष्टी व कौशल्ये आत्मसात करून यशस्वी व्हावे, यासाठी प्रत्येकाला वाटते. यासाठी घरी अभ्यास घेणे किंवा खासगी क्लास लावणे असे विविध प्रयत्न केले जातात. सर्व प्रयत्नांमुळे काही विद्यार्थ्यांना यश मिळते, तर काही विद्यार्थी वारंवार अपयशी होतात. वाचन, लेखन व गणितात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना मदत करण्यासाठी ‘डॉ. अंजली मॉरिस एज्युकेशन अॅण्ड हेल्थ फाउंडेशन’ प्रयत्न करत आहे.
शाळेत शिकत असताना काही मुलांना वाचन, लेखन, गणित समजणे व सोडवणे यामध्ये अडचणी येतात. यामध्ये काही मुलांना सामान्य बुद्धिमत्ता असूनही शाळेत शिकताना अडचण येते. तसेच, सामान्य बुद्धिमत्ता असून व शिक्षक आणि पालकांनी विशेष प्रयत्न करूनही विद्यार्थी शिक्षणात मागे पडत असेल, तर त्या विद्यार्थ्यास अध्ययन- अक्षमता ही समस्या आहे, असे म्हणतात.
अध्ययन - अक्षमता म्हणजे का?
अध्ययनातील समस्या, अध्ययन अक्षमता या समस्येचे नेमके कारण अजूनही कळलेले नाही. संशोधनानुसार आनुवंशिक, जनुकीय कारणे, अपुऱ्या दिवसांच्या किंवा जन्मत: कमी वजनाच्या बाळांमध्ये मेंदूला मिळालेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूचा जंतूसंसर्ग झाल्यामुळे आणि कुपोषणामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. अशी मुले दिव्यांग, मतिमंद व विकलांग नसतात. ही मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणेच असतात. फक्त त्यांना शिक्षणात अडचणी येतात.
अध्ययन अक्षमतेचे प्रकार
भाषेतील अक्षमता (Dyslexia) : भाषा समजायला, भाषेचे आकलन होण्यास, बोलण्यास, वाचण्यास आणि लिहिण्यास अडथळा येतो.
लेखनातील अक्षमता (Dysgraphia) : न वाचता येणारे हस्ताक्षर, स्पेलिंगच्या चुका, शब्द चुकणे या समस्या दिसून येतात.
अंक ओळखणे व गणना करण्यात अक्षमता (Dyscalcalia) : अंकच कळत नाहीत, कळले तरी गणितातील प्रक्रिया जमत नाही.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी
अध्ययन अक्षमतेचे निदान शिक्षक, पालक, बालरोगतज्ज्ञ व बालमानसतज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमधून होऊ शकते. जेव्हा मुलांना वाचन, लेखन किंवा गणितामध्ये अडचण येते किंवा ते त्यांच्या बरोबरीच्या मुलांच्या गतीने शिकू शकत नाहीत, तेव्हा त्यांची शिकण्याची आवड कमी होऊ शकते.
अशा वाचन, लेखन व गणितात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने डॉ. अंजली मॉरिस यांनी पुण्यात ‘डॉ. अंजली मॉरिस एज्युकेशन अॅण्ड हेल्थ फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना २००८ मध्ये केली.
स्वावलंबी बनवण्यास मदत
पूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या या संस्थेत अध्ययन- अक्षम विद्यार्थ्यांना व्यक्तिगत आणि समूहपातळीवर शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी मूलभूत कौशल्यांचे उपचारात्मक शिक्षण दिले जाते. तसेच, अशा मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याला समजून घेण्यासाठी संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते.
याशिवाय अध्ययन अक्षमतेची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि उपचारात्मक शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनाही संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाते. २००८ मध्ये संस्था स्थापना झाल्यापासून संस्थेच्या प्रशिक्षणाचा लाभ सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. संस्थेने ५१ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांना प्रशिक्षित केले असून, २५ हजारांहून अधिक व्यक्तींसाठी ३०० पेक्षा जास्त मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
संस्थेचे उपक्रम....
१. डिरेक्क्ट सर्व्हिसेस
मॉरिस फाउंडेशनमधील प्रशिक्षित शिक्षक संलग्न शाळांमध्ये जाऊन, अध्ययन अक्षमता आणि अतिचंचलता असलेल्या व असण्याची शक्यता असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणित चाचण्या वापरून मूल्यमापन करतात. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार व्यक्तिगत शैक्षणिक आराखडा तयार करून, संशोधनावर आधारित सुधारित तंत्रे वापरून उपचारात्मक शिक्षण दिले जाते.
यासोबतच संस्थेच्या रिसोर्स व सॅटेलाइट सेंटरमध्ये आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अनेक संलग्न शाळांमध्ये एसएलडी असलेल्या मुलांना प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचे प्रशिक्षित शिक्षक (RT’s) वाचन, वाचन-आकलन, लेखन व गणितातील विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखतात आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या सामर्थ्याचा उपयोग करणारी कौशल्ये आणि धोरणे शिकवतात.
२. तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रम (TAP)
संस्थेकडून शिक्षकांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामध्ये संस्थेकडून निवडक शाळा आणि शैक्षणिक संस्थांना त्यांची स्वतःची संशोधन व प्रशिक्षण उपचारात्मक शिक्षण देणारी केंद्रे स्थापन करण्यास मदत केली जाते. मुलांची अध्ययन अक्षमता तपासण्यासाठी व मुलांचे मूल्यमापन करण्यासाठी,
वैयक्तिकरित्या किंवा लहान गटांमध्ये त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी संस्थेकडून शिक्षकांच्या गटाला तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. संस्थेकडून शिक्षकांच्या गटाला तीन ते पाच वर्षे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. जेणेकरून शाळेनंतर त्यांची संशोधन, प्रशिक्षण व उपचारात्मक शिक्षण देणारी केंद्रे स्वतंत्रपणे चालवू शकतील.
३. संशोधन
विद्यार्थ्यांना उपचारात्मक शिक्षण देण्याआधी त्यांची अभ्यासातील नेमकी अडचण काय आहे, हे चाचण्यांमार्फत पाहिले जाते. अशा प्रमाणित चाचण्या इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. इंग्रजीप्रमाणेच मराठी भाषेमध्ये प्रमाणित चाचण्या विकसित करण्यासाठी मॉरिस फाउंडेशन येथे संशोधन सुरु आहे.
४. जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
संस्थेकडून अध्ययन अक्षमतेविषयी समाजात जनजागृतीसाठी विविध मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन केले जाते. अध्ययन अक्षमतेविषयी महाराष्ट्रभर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यासाठी, संस्थेला सामूहिक मदतीची गरज आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ः ८६०५०१७३६६
अशी करा मदत...
‘सोशल फॉर अॅक्शन’ या क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘मॉरिस फाउंडेशन’ संस्थेची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी- भारतीय नागरिक ‘सोशल फॉर अॅक्शन’ या वेबसाइटला भेट देऊन, संस्थेच्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटनावर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.
खालील बँक खात्यात ऑनलाइन देणगी पाठवू शकता. देणगी पाठविल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सॲप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
Name : Social For Action
Bank A/C Number : ०४५९१०४०००११७८५२
Name of Bank : IDBI bank , Laxmi Road ,Pune.
IFSC Code : IBKL००००४५९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.