esakal | विशेष : पर्यटन व्यवसाय आणि करिअर संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism

विशेष : पर्यटन व्यवसाय आणि करिअर संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जगभरात पसरलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसलेला असला, तरी जगभरात सर्वाधिक झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी पर्यटन हे एक क्षेत्र आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निर्बंध शिथिल होताच नागरिकांना कोरोनाचा विसर पडून पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणता गर्दी होताना दिसत आहे.

पर्यटन आजच्या आधुनिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यात येत आहे. भारताला सर्वात मोठी प्राकृतिक विविधता लाभलेली आहे. भारतामध्ये पर्यटन क्षेत्राला मोठा वाव आहे. देशातील प्रत्येक राज्य पर्यटनाच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जाते, महाराष्ट्रात देखील पर्यटनाला मोठा वाव आहे. महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्य अभिमानास्पद असून, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पर्यटन क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिल्यास नवनव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

आता जनजीवन सुरळीत होत चालल्यामुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडू लागले आहेत. परदेशी पर्यटनावर निर्बंध असल्याने देशांतर्गत पर्यटन वाढलेले पाहायला मिळत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. पर्यटन केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर ज्ञान मिळविण्यासाठी महत्त्वाचे मानले गेले आहे. साधारणतः उन्हाळ्यातील एप्रिल ते जुलैदरम्यान देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहली आयोजित केल्या जातात. शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने एप्रिल, मे हा पर्यटन व्यवसायासाठी उत्तम काळ मानला जातो. दळवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्तसंचार करणे आता सोपे झाले आहे. देशाच्या कुठल्याही प्रदेशात किंवा परदेशगमन करण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. वर्षभरात पर्यटन या क्षेत्रात २५ टक्क्याने वाढ होते. या क्षेत्राशी संबंधित पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी असे अभ्यासक्रम आता सगळ्याच विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी, तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषांवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते. सामाजिक नितीनियमांचा आणि परंपरांचा आदर करणेही गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी.

भवितव्य प्रकाशमान

माहिती सहायक, गाईड (मार्गदर्शक), टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल क्षेत्र, विमान कंपन्या, वाहतूक सेवा इत्यादी क्षेत्रात नोकरी मिळू शकते. एअर होस्टेसपासून ऑपरेशन व्यवस्थापकापर्यंत पर्याय उपलब्ध होतात. पर्यटनातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या पर्यटन संचलनालय विभागात स्पर्धा परीक्षाद्वारे नोकरी मिळू शकते. खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील नोकरी मिळू शकते. तसेच अनेक परदेशी कंपन्यात संधीही आहेत. अनेक विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते.

ट्रॅव्हल अँड टुरिझमचा व्यवसाय गेल्या काही वर्षापासून भरभराटीला आला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने पर्यटन व्यवसायाचे महत्त्व ओळखून गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक पर्यटन स्थळांचा विकास करण्याचे धोरण स्वीकारले आहे. पर्यटन स्थळी उत्तम दर्जाची हॉटेल्स सुरू झाली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे/रिसॉर्ट खुली असून पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. हे सर्व बघता निश्चितपणे आगामी काळात संपूर्ण भारतातील आणि राज्यातील पर्यटनाचे भवितव्य प्रकाशमान दिसू शकेल.

- प्राचार्य डॉ. अजयकुमार राय

loading image
go to top