esakal | विशेष : बेकरी शेफचे स्मार्ट करिअर | Bakery Chefs
sakal

बोलून बातमी शोधा

Bakery
विशेष : बेकरी शेफचे स्मार्ट करिअर

विशेष : बेकरी शेफचे स्मार्ट करिअर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अजयकुमार राय

आता आधुनिक काळाची मुले इतकी बदलली की, भाजी-चपाती खाण्यापेक्षा फास्ट फूड, बेकरी पदार्थ हे मुलांच्या रोजच्या आहाराचा भाग व्हायला लागले असून ते आवडीने खाताना दिसतात. त्यातच कोरोनामुळे बाहेरचे खाणे आरोग्याला अपायकारक ठरू लागले, टाळेबंदी जाहीर झाली आणि वाढदिवसाचा केक देखील घरीच बनवायची वेळ आली. गरमागरम चहासोबत ब्रेड, बटर, बिस्कीट आणि खारी अशा बेकरीतून आणलेल्या खाद्यपदार्थानी प्रत्येकाची सकाळ उजाडते. जागतिक पातळीवर बेकरी उद्योग हा प्राचीन काळापासूनचा असल्याचे दिसून येते. बेकरी व्यवसाय हा भारतातील अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सर्वांत मोठा उद्योग आहे. शिवाय, बेकरी उत्पादनांची देशांतर्गत मागणी मोठी आहे. त्यामुळे बेकरी हा खूप मोठ्या प्रमाणात करिअर संधी असलेला उद्योग आहे. बेकरी उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, याला कौशल्य आणि ज्ञानाची योग्य जोड दिली तर यशस्वी बेकरी उद्योग उभा करता येऊ शकते.

बेकरी शिक्षणासाठी

अनेकांना वाटते की, हॉटेल मॅनेजमेंटमध्येच बेकरीचे शिक्षण मिळते, परंतु ते खूप मूलभूत असते. एखाद्या उद्योगात यशस्वी होण्यासाठी त्याचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे असते. त्याच प्रमाणे हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल शिक्षण घेणे आवश्यक आहे. बेकरी पदविका आणि पदवी हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम असून यामध्ये बेकरी उत्पादनांशी संबंधित विषयाचे प्रात्यक्षिकासह सखोल ज्ञान दिले जाते, तसेच काही अल्प कालावधीचे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. बेकरी उत्पादने म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर प्रथम येते ते म्हणजे पाव, ब्रेड, बिस्कीट, खारी ई. पदार्थ, परंतु आता बेकरीचे रूप खूप विस्तारले आहे. लोकांना आकर्षित करणारे केक, पिझ्झा, बर्गर, कुकीज, अशा कितीतरी नवनवीन पदार्थांचा त्यात समावेश झाला असून, त्यांचे कितीतरी प्रकार बघायला मिळतात. सध्या बेकरीतील विविध उत्पादने मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. अलीकडे अधिक आरोग्यदायक उत्पादनांसाठी कमी ट्रान्स फॅट आणि कमी कॅलरीज असणाऱ्या सामग्रीचा वापर वाढू लागला आहे. संतुलित पोषणाच्या दृष्टीने नैसर्गिक पदार्थासोबत लोह, कॅल्शिअम व प्रथिने या पोषण मूल्यांचा वापर केला जातो. आठ धान्यांचा समावेश असलेला मल्टीग्रेन ब्रेड, हेल्थ कॉन्शस मंडळींसाठी होल व्हीट ब्रेड, मिल्क ब्रेड, ओट्स ब्रेड असे अनेक प्रकार आहेत. गेल्या काही काळात ‘वाईन अँड डाईन’ मधला फोकासिया हा इटालियन ब्रेड लोकप्रिय होऊ लागला आहे. तर काहीजणांनी काळाची पावले ओळखून फेरबदल केले आणि बेकरी व्यवसायाला फास्ट फूडची जोड दिली. पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग, वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस असे अनेक ताजे पदार्थ बेकरीतच मिळतात.

गुंतवणूक कमी

इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. योग्य संधी आणि निर्णय याची सांगड घालून या उद्योगात उतरल्यास यश नक्कीच मिळेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारदेखील मदत करते. या व्यवसायातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. यावरूनच या व्यवसायाच्या विस्ताराची कल्पना येईल. स्थानिक व्यवसायासह, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बेकरी व्यवसाय स्थिरावलेला दिसून येतो. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरजसुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे, परंतु योग्य शैक्षणिक संस्थेतून योग्य शिक्षण घेतले तरच कुशल बेकर्स निर्माण होतील, ज्यामुळे लोकांना आरोग्याला पोषक, स्वच्छ असे बेकरी पदार्थ मिळण्यास मदत होईल, जी काळाची गरज झाली आहे.

करिअर संधी

 • फाइव्ह स्टार हॉटेल्स

 • रेस्टॉरंट

 • पेस्ट्री शेफ

 • सेल्स ऑफिसर

 • बेकर्स

 • केक डेकोरेटर

 • बेकरी टेक्नोलॉजिस्ट

 • बिस्कीट, चॉकलेट उद्योग

 • प्रवासी जहाजांवरील खानपान सेवा

 • हॉस्पिटल

 • कॉर्पोरेट कँटीन

 • मॉल्स

 • रेल्वे खानपान सेवा

तसेच पुरेशा अनुभवानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी अशा अनेक क्षेत्रातही नोकरी मिळू शकते.

loading image
go to top