

दहावी-बारावीच्या टप्प्यावर करिअर निवड करताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःची ओळख करून घेणे म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.
- प्रा. डॉ. दीपक ताटपुजे
दहावी-बारावीच्या टप्प्यावर करिअर निवड करताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःची ओळख करून घेणे म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर करिअर विषयक कल जाणून घेऊन त्यानंतरच अभ्यासक्रमांची निवड करणे महत्त्वाचे असून केवळ मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे करिअर निवड करण्याची मर्यादाही लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे.
सर्वसाधारणपणे करिअर निवडीसाठी विविध व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे आकलन गरजेचे असून त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता (इमोशनल इंटेलिजन्स), स्पष्टवक्तेपणा (ओपननेस), भावनाशीलता (न्युरोटिसिझम), सद्विवेकशीलता (कॉन्शसनेस), बहिर्मुख (एक्सट्राव्हरशन), सहविचारक्षमता (एग्रीएबलनेस), रोजगारक्षमता (एम्प्लोयाबिलिटी) आदी व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा प्राधान्याने समावेश होतो. लवचिकपणा आणि कणखरता या दोन पैलूंचा विशेषत: भावनिक बुद्धिमत्तेत समावेश असून त्याचे विश्लेषणही महत्त्वाचे आहे. भावनिक बुद्ध्यांक हा करिअर निवडीमध्ये महत्त्वाचा पैलू आहे. विद्यार्थ्यांची चौकसवृत्ती आणि सर्वसाधारण जागरूकता ही करिअर निवडीच्या प्रक्रियेला पूरक असून अतिसंवेदनशीलता किंवा आत्मविश्वासकता हा व्यक्तिमत्त्वाचा पैलूही करिअरसाठी महत्त्वाचा ठरतो आहे.
कलनिश्चिती
अनेक मानसिक कसोट्यांद्वारे कार्यक्षमता तसेच विद्यार्थ्याच्या कृतीबाबत दक्ष नसणाऱ्या निष्काळजीपणाचा ही विचार करिअर निवडीसाठी होतो आहे. उभय संबंधांवर आधारित सहयोगीत्व आणि दैनंदिन व्यवहाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहविचार क्षमतेचा कोशंट माहीत असणे हे कलनिश्चिती एवढेच महत्त्वाचे आहे.
कोणत्याही क्षेत्रातील करिअर निवडीच्या यशासाठी विद्यार्थ्याचा रोजगार क्षमताअंक म्हणजेच एम्प्लोयाबिलिटी कोशंट काढून घेणे गरजेचे आहे विकसित तसेच विकसनशील रोजगार क्षमतांक असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत. करिअर निवडताना व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंच्या जाणीवे बरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर विषयक कल (करिअर ॲप्टिट्यूड)ची माहिती असावी. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू हे आपल्या करिअरविषयक कल निश्चितेशी सुसंगत आहेत का, याची पडताळणी विद्यार्थी व पालक करिअर समुपदेशकाद्वारे सहजपणे करू शकतात. अनेक वेळा वरील उल्लेखित व्यक्तिमत्त्वाच्या पैलूं व्यतिरिक्त अन्य पैलूंचा विचार आहे केला जातो. करिअर कल विषयक निवड कसोट्यांचा उपयोग करून घेणेही महत्त्वाचे आहे.
संधी लक्षात घ्या
दहावी-बारावीनंतर अभ्यासक्रमाची निवडही विविध क्षेत्रांची माहिती तसेच येत्या काळात नव्याने निर्मित होणाऱ्या क्षेत्राबद्दलचे आकलन आणि रोजगार उपलब्धतेची संधी आदींद्वारे करणे ही प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. दहावी-बारावीनंतर किती काळ आपण शिक्षण घेणार आहोत या ठरविलेल्या मुदतीवर आधारित ही अभ्यासक्रम निवडीचे निर्णय बदलू शकतात. कमी कालावधीसाठी अल्पमुदतीचे तंत्र कौशल्य अभ्यासक्रम तसेच मध्यम कालावधीसाठी ज्ञानसंवर्धिनीत आंतरशाखीय पूरक अभ्यासक्रम तसेच दीर्घ मुदतीसाठी आंतर परिवर्तनीय संशोधन अभ्यासक्रम अशा विविध प्रकारच्या करिअरसाठी आपण विचार करू शकतो. कौशल्याधारित अभ्यासक्रमांची निवड व्यक्तिमत्त्वाचे पैलू यांची एकत्रित सांगड घालून निवडलेल्या या करिअरमध्ये सर्वाधिक यश मिळवणे सहज शक्य आहे.
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्याधारित अभ्यासक्रम, ज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रम त्याचप्रमाणे बहुविध कौशल्य अभ्यासक्रम आदींची निवड करताना अनेक शास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो. त्याची सखोल माहिती घेऊन करिअर समुपदेशकाद्वारे अभ्यासक्रम निवडणे सहज शक्य आहे. विविध प्रकारच्या शैक्षणिक पद्धतींमध्ये वरील उल्लेखित तसेच अन्य व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचा यथायोग्य वापर होत असल्याने अभ्यासक्रम निवडी पूर्वी स्वतःला ओळखणे, करिअरकलची निश्चिती करून घेणे व त्यानुसार विशिष्ट कालावधीसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची निवड करणे अशी एकत्रित प्रक्रिया यशस्वीतेसाठी गरजेची आहे. व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण आणि उद्योजकीय शिक्षण आदी क्षेत्रांच्या एकत्रित अभ्यासक्रमांचा विचार प्राधान्याने होत आहे. जागतिकीकरणाच्या रेट्याने अत्याधुनिक नव कौशल्य निर्मितीची सांगड ही उपलब्ध अभ्यासक्रमाशी कौशल्यांद्वारे घेऊन करिअर निवडीचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. स्थानिक स्थळावरील रोजगार उपलब्धता आणि इंटरनेट माध्यमाद्वारे उपलब्ध झालेल्या विविध तंत्रकौशल्यांचा वापर आणि त्या कौशल्यांची निर्मिती ही करिअर निवडीसाठी महत्त्वाचा पर्याय ठरत असल्याने करिअर निवडीची शास्त्रीय कसोट्यांद्वारे परिणामकारकता स्पष्ट झाली आहे.
(लेखक सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात संशोधन प्रकल्पांचे प्रमुख आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.