वेगळ्या वाटा : इन्फ्रास्ट्रक्चरमधील स्मार्ट ट्रेंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infrastructure

स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत सुविधा या ‘सायबर फिजिकल सिस्टिम्स’ म्हणून ओळखल्या जातात.

वेगळ्या वाटा : इन्फ्रास्ट्रक्चरमधील स्मार्ट ट्रेंड

- प्रा. डॉ. गणेश इंगळे

स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत सुविधा या ‘सायबर फिजिकल सिस्टिम्स’ म्हणून ओळखल्या जातात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत माहितीचा संचय करून विश्लेषणाद्वारे टिकाऊ उत्पादनक्षम व सुरक्षित अशा सुविधा निर्माण करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. साधारणत- माहिती, विश्लेषण व त्यावर आधारित बदल व सद्य-स्थिती आणि भविष्यातील गरजांची पूर्तता करण्याची क्षमता या चार तत्त्वावर या सुविधा आधारित असतात. त्या पुरवण्यामागे स्थापत्य अभियांत्रिकीचा मोठा सहभाग आहे.

उद्योगामध्ये अचूकता वाढवण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सहयोगी रोबोटस, स्वायत्त उपकरणे, ड्रोन आधारित तपासणी आणि लेझर-आधारित भूप्रदेश मॅपिंग, मॉड्युलर बांधकामातील नॅनोमटेरियल्स आणि थ्रीडी प्रिंटिंग असे सध्याचे ट्रेंड विकसित आहेत. स्थापत्य अभियंते व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), बिल्डिंग मॉडेलिंग (बीआयएम), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयपोटी), थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान इत्यादीसारख्या संगणकीय तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

व्हर्च्युअल रिअॅलिटी, प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वीच नियोजित बांधकामात पाऊल टाकण्याचा आभासी अनुभव प्रदान करते. कोणत्याही प्रकल्पाच्या कामाच्या बांधकामापूर्वी उद्‍भवणाऱ्या संभाव्य समस्याही ओळखू शकते. ऑगमेंटेड रिअॅलिटी सिव्हिल इंजिनिअर्सना डिझाइन स्पेसिफिकेशन्स, आरोग्य आणि सुरक्षा चेतावणी इत्यादींशी संबंधित उपयुक्त माहिती पुरवते. बिल्डिंग इन्फर्मेशन मॉडेलिंगचा वापर अतिअद्ययावत इमारती व ब्रिजमध्ये सुरू झाला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज हे सेन्सर्स आणि स्मार्ट उपकरणांच्या वापराविषयी आहे आणि याचा वापर स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रात यशस्वीरीत्या होत आहे. हे सेन्सर्स, स्मार्ट उपकरणे संरचनाच्या मजबुती आणि टिकाऊ विषयी माहिती गोळा करते. त्या माहितीच्या आधारे संरचनांची पुढील देखभाल ठरवली जाते.

कचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे व्यवस्थापन, पार्किंग, ट्रॅफिक, जंगल किंवा आसपासच्या प्रदेशातील आग किंवा वणवा, ऊर्जा, इमारतीमधील पाण्याचे सुयोग्य नियोजन, पाण्याचा दर्जा, रेडिएशनची पातळी, प्रदर्शन इत्यादी अनेक कार्य नियंत्रित करणे घरबसल्या शक्य झाले आहे. थ्रीडी प्रिंटिंगचा उपयोग प्रस्तावित संरचनेचे प्रोटोटाइप/स्केल मॉडेल विकसित करण्यासाठी केला जातो.

ड्रोनमुळे मोठ्या प्रमाणात डेटा संकलित करण्यासाठी आणि बांधकाम प्रकल्पांचे धोकादायक भाग अल्पावधीत ओळखण्यासाठी उपयुक्त ठरतं. हे तंत्रज्ञान सर्वेक्षकाला जोखीम न घेता आपले कार्य पूर्ण करण्यास मदत करते. ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर बांधकाम उद्योगांमध्ये अनिवार्य झाला आहे. बांधकामाच्या सुरूवातीपासून ते पूर्ण होईपर्यंत याचा वापर केला जातो. यामुळे भूमापन, जमिनीचे अचूक सर्वेक्षण, बांधकामातील प्रगती, कामगारावर देखरेख याची अचूक व सविस्तर माहिती आपल्याला मिळते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वेळेची बचत होऊन, खर्चात कपात होण्यास मदत झाली आहे. कमी वेळात जटिल संरचनांची निर्मिती झाल्यामुळे उत्पादकता वाढली आहे.