esakal | विशेष : केमिकल इंजिनिअरिंगमधील रोजगार संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Chemical Engineering

विशेष : केमिकल इंजिनिअरिंगमधील रोजगार संधी

sakal_logo
By
प्रशांत पाटील

रासायनिक अभियंते नवीन रासायनिक प्रक्रिया/उत्पादने यांचा आराखडा विकसित करतात. रासायनिक उद्योगामध्ये उपकरणांची देखरेख, नियोजन आणि व्यवस्था पाहण्याची त्यांची जबाबदारी असते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये केमिकल इंजिनिअर्ससाठी सर्वोत्तम नोकरीच्या संधी आहेत. यात महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न कंपन्यांचा समावेश असतो. केमिकल अभियांत्रिकी पदवीधरांना पेट्रोकेमिकल आणि रिफायनरीज, खते, औषधी, अणू आणि ऊर्जा संयंत्र आणि संशोधन संस्थांमध्ये नोकरीच्या संधी आहेत.

1) सरकारी नोकरीच्या संधी

अ) सार्वनिक क्षेत्रातील उपक्रम

सेल, ओएनजीसी, एनटीपीसी, सीआयएल, ऑइल, गेल, आयओसीएल, भेल, एनटीपीसी, जीएसपीसी, बीपीसीएल, एचपीसीएल या काही मोठ्या पीएसयू कंपन्या आहेत. अभियांत्रिकीची Graduate Aptitude Test in Engineering (GATE) या प्रवेश परीक्षेच्या आधारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उमेदवार नेमण्याची प्रक्रिया करतात. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये रासायनिक अभियंत्यांना अंदाजे वार्षिक १२ ते १५ लाख पगार मिळू शकतो.

ब) संशोधन संस्थेतील करिअर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) : इस्रोमधील करिअरमध्ये प्रक्षेपण वाहने, उपग्रह आणि संबंधित तंत्रज्ञानाची रचना आणि विकास करण्यात येतो. इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड (आयसीआरबी) उमेदवार भरतीसाठी परीक्षा घेते. रासायनिक अभियंत्यांना अंदाजे वार्षिक ५ ते १० लाख पगार मिळू शकतो.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) : भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या सर्व ‘आर अँड डी’ची जबाबदारी डीआरडीओ या संस्थेची आहे. मुख्य संरक्षण तंत्रज्ञान आणि यंत्रणेत आत्मनिर्भरता मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. डीआरडीओ अत्यंत पात्र व कुशल शास्त्रज्ञ व अभियंता नियुक्त करते. रासायनिक अभियंत्यांना अंदाजे वार्षिक ५ ते १० लाख पगार मिळू शकतो.

भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) : ही संस्था रासायनिक अभियंत्यांसाठी सृजनशील आणि फायद्याच्या कारकिर्दीची संधी प्रदान करते. रासायनिक अंभियंते विभक्त इंधन चक्रात आवश्यक सामग्रीचे उत्पादन, पृथक्करण, शुद्धीकरण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देतात.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) : सीएसआयआरमध्ये केमिकल इंजिनिअर्सना करिअरच्या मोठया संधी आहेत. रासायनिक अभियंत्यांना नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, डेहराडून आदी संस्थामध्ये नोकरीच्या संधी आहेत.

क) यूपीएससीमार्फत नोकरीच्या संधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवांसाठी घेतलेल्या परीक्षेस रासायनिक अभियंता बसू शकतात, आणि पर्यायी पेपर म्हणून रासायनिक अभियांत्रिकीसह आयएफएस (भारतीय वन सेवा) देखील देऊ शकतात. ग्रुप-ए पदासाठी यूपीएससीतर्फे होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा सुद्धा (आईएस) देऊ शकतात.

यूपीएससी विविध मंत्रालयांतर्गत फ्रेश, तसेच अनुभवी रासायनिक अभियांत्रिकी पदवीधरांकडून अर्ज मागवते. रसायन व पेट्रोकेमिकल्स मंत्रालय, पेट्रोलियम व विस्फोटक सुरक्षा संस्था, औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, विस्फोटक विभाग आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींचा समावेश आहे.

2) प्रवेश परीक्षेची तयारी

केमिकल इंजिनिअरिंगबद्दल संपूर्ण व्यावहारिक आणि सैद्धांतिक समज रासायनिक अभियंत्यांसाठी सर्वांत महत्त्वाचे कौशल्य आहे. या प्रवेश परीक्षा स्पर्धात्मक असल्याने, उमेदवारांनी प्रवेश परीक्षेची कसून तयारी करावी. नोकरीच्या संधीसाठी : http://entrance-exam.net/government-jobs-after-a-btech-in-chemical-engineering/

- डॉ. किरण पाटील