

Dr. Milind Naik emphasizes the need for student-centric and proficiency-based education system in India
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
आजच्या परिस्थितीत शिक्षणाचा संपूर्ण दृष्टिकोन बदलण्याची, शिक्षणाची रचना विद्यार्थीकेंद्रित, लवचिक आणि निपुणताधारित म्हणजेच एकंदरीत समताधिष्ठित करण्याची गरज आहे. समताधिष्ठित शिक्षणासाठी महत्त्वाची अट म्हणजे शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता आले पाहिजे. एका वर्गात ५०-६० विद्यार्थी असतील तर प्रत्येकाच्या अडचणी, क्षमता आणि प्रगती समजून घेणे शिक्षकाला अशक्यप्राय ठरते. म्हणूनच शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर लक्षणीयरीत्या कमी करणे आवश्यक आहे. चांगली शिक्षण पद्धती असणाऱ्या काही देशांमध्ये हे प्रमाण २५ विद्यार्थ्यांमागे २ शिक्षक आणि सहशिक्षक असे असल्याने हे शक्य होऊ शकते. इथेही विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षक विद्यार्थ्याचे निरीक्षण करून वैयक्तिक मार्गदर्शन करू शकेल. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे योग्य ती आव्हानात्मक कार्ये देऊन गरज पडल्यास वेळेवर मार्गदर्शनही करू शकेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षकाची भूमिका ‘व्याख्याता’ऐवजी ‘अधिमित्र’ अशी होऊ शकेल.