वर्तनात्मक बुद्धिमत्ता

एका प्रतिथयश इस्पितळात दोन डॉक्टर कार्यरत होते. त्यातल्या एका डॉक्टरांभोवती बहुतांश लोकांची गर्दी असायची.
Behavioral Intelligence
Behavioral Intelligencesakal

एका प्रतिथयश इस्पितळात दोन डॉक्टर कार्यरत होते. त्यातल्या एका डॉक्टरांभोवती बहुतांश लोकांची गर्दी असायची, तर दुसऱ्या डॉक्टरांना आपले काम कसेबसे पूर्ण करता येईल एवढाच लोकसंग्रह करता येत असे. रुग्णच नव्हे, तर इस्पितळातील कर्मचारी सदस्यांनाही पहिल्या डॉक्टरांबरोबर संवाद साधणे आवडत असे, तर दुसऱ्यांशी संवाद करणे सर्व जण टाळत असत.

वास्तविक पाहता पहिले डॉक्टर फार चांगल्या नाही, पण एका बऱ्या महाविद्यालयातून शिकलेले होते. दुसऱ्या डॉक्टरांनी भारतातील सर्वांत उत्तम महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतलेले होते. वैद्यकीय गुणवत्तेमध्ये फारसा फरक नसताना लोकांची पसंती मात्र पहिल्या डॉक्टरांना होती. दुसऱ्याकडे जाण्यासाठी लोक फार उत्सुक नसत. असा फरक का बरं पडला असेल? दुसऱ्या डॉक्टरांकडे माणसांना हाताळण्याची हातोटी होती.

अभ्यासक्रमाच्या पलीकडची जगात कसे वागावे या प्रकारची बुद्धीमत्ताही विकसित झालेली होती. माणसाच्या आयुष्यातील यश हे एकमेकांना जाणून घेण्यात, परस्परसंबंध हाताळण्यात व सामाजिक परिस्थितीत आवश्यक ते निर्णय घेण्यात साठवलेले असते. यासाठी लागणारी बुद्धिमत्ता काही वेगळ्या प्रकारची असते. बौद्धिक चाचण्यांत अथवा पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमात याचा अंतर्भाव असतोच असे नाही.

नेतृत्वगुण

काही लहान मुलेसुद्धा चलाख असतात. घरातील आई अथवा शाळेतील शिक्षिका यांना एखादे म्हणणे पटवून देण्यात पटाईत असतात. साहजिकच घरातील अथवा शाळेतील नेतृत्व अशा विद्यार्थ्यांकडे येते. शाळेत एखाद्या गटाकडून काम करवून घेणे यांना सहज जमते. ही बुद्धिमत्ता काही तरी वेगळीच असते.

चेहऱ्यावरील हावभाव, वागण्या-बोलण्याची पद्धत यांचा उपयोग करून दुसऱ्या व्यक्तीच्या मनात काय आहे, ती व्यक्ती कशी वागेल याचा अंदाज त्यांना बांधता येतो. एखाद्याबरोबर बोलत असताना त्या व्यक्तीचे लक्ष कुठे आहे? कशाचे निरीक्षण चालू आहे? त्या व्यक्तीला काय वाटत आहे? कोणत्या भावना निर्माण होत आहेत? तिच्या मनात काय हेतू आहे?

असे शरीराच्या हालचाली व चेहऱ्यावरच्या भावांचे निरीक्षण करून त्या व्यक्तीच्या बोलण्यातून शब्दांच्या आशयाबरोबरच किंबहुना काही वेळा त्यापेक्षा अधिकही परिस्थितीचे आकलन होऊन प्रतिसाद काय द्यायचा? याचा निर्णय ते घेऊ शकतात. बाबा संध्याकाळी घरी आल्यावर परत हॉटेलमध्ये जेवायला जाण्याच्या मूडमध्ये आहेत का?

चहाचा कप देतानाच्या हालचाली बघून आज आईसाहेबांचं काहीतरी बिनसलंय, भाऊ किंवा बहिणीनं आईचा धरलेला हात पाहून भावंड घाबरलंय, हे ते सहज ओळखतात. त्यांच्याकडे वर्तनात्मक बुद्धिमत्ता असते. असे विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमात यशस्वी असतातच असे नाही.

माणसे ओळखा

राजकीय नेते, व्यवस्थापक, शिक्षक, विक्रेते, डॉक्टर, वकील, धर्मोपदेशक, गृहिणी या सर्वांनाच मानवी वर्तनाचा विचार करावा लागतो. भेटून गेलेली माणसे गुणदोषांसहित नीट ओळखणे व लक्षात ठेवणे या बाबत त्यांना पटाईत असावं लागतं. हतबल होणारी किंवा नाठाळ मुले कोणती किंवा कोणत्या विद्यार्थ्यांमधे मैत्री अथवा पूर्वीची भांडणे आहेत हे लक्षात ठेवावे लागते.

माणसं नुसते ओळखून, लक्षात ठेवून पुरत नाही तर युक्त्या वापरून त्यांना हाताळता यावे लागते.

एखाद्याचे वर्तन एखाद्या विशिष्ट प्रसंगी कसे झाले? कसे असायला हवे होते? याबद्दल त्यांचे मत अचूक असते. तुझे वागणे योग्य नव्हते, चेहरा असा काय केला होता? तो रडत असताना तू हसायला नको होतेस, चारचौघांत असताना असे वागू नये असे ज्यांना समजते त्यांची वर्तनात्मक बुद्धिमत्ता चांगली असते.

आपल्या या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा कधी शोध घेतला आहे का? आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याविषयी काय बोलतात? ह्याला कुठे चारचौघांत नेण्याच्या लायकीचा नाही, असे लोकांना वाटते की आपल्यामुळे प्रश्न सुटतात, नवीन ठिकाणी संवाद साधायला सोपे जाते असे वाटून लोक आपल्याला बरोबर घेऊन जातात? स्वतःचे निरीक्षण करा. काही गोष्टी सरावाने वाढवता येतात. तसाही प्रयत्न करत राहा.

हे कौशल्य जवळपास सर्वच जीवनकार्यांसाठी आवश्यक आहे. एवढेच नव्हे, तर दैनंदिन जीवन जगण्यासाठी किमान वर्तनात्मक बुद्धिमत्ता आवश्यक असते. मात्र, काही कार्यक्षेत्रे अशी आहेत की, जिथे विशेषत्वाने वर्तनात्मक बुद्धिमत्ता लागते. या बुद्धिमत्तेच्या पैलूंविषयी नोंदी करून ठेवा. जीवनकार्य निवडताना आपल्याला या निरीक्षणांचा उपयोग होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com