हेल्थ केअर : युग टेलिमेडिसिनचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Telemedicine
हेल्थ केअर : युग टेलिमेडिसिनचे

हेल्थ केअर : युग टेलिमेडिसिनचे

कोरोनानंतर वैद्यकीय क्षेत्राकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन विकसित झाला. या क्षेत्रातील मार्केट ट्रेंड आणि करिअरच्या संधींची माहिती देणारे हे सदर.

दोन वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरातील सर्वच देशांच्या आरोग्य यंत्रणेला खडबडून जागे केले आहे. जगातील अत्युच्च दर्जाची आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या युरोपियन देश, अमेरिका,ऑस्ट्रेलिया ते जपान या सर्वच देशांच्या आरोग्य यंत्रणेतील उणिवा या दोन वर्षात दिसून आल्या आहेत. जगात कोणताच देश आपल्या सर्व वयोगटातील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा देऊ शकत नाही हे ठळकपणे जाणवले. २०२१च्या उत्तर्धारतात भारतामधील कोरोनाची लाट संपत आलेली असतानाच अचानक ‘ओमिक्रॉन’ या व्हायरसच्या नवीन अवताराने डोके वर काढल्याने पुन्हा आपली वाटचाल तिसऱ्या लाटेकडे होतेय की काय, अशी भीती आरोग्य यंत्रणेला वाटू लागली आहे.

कोरोनाच्या सुरवातीसच जगातील अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले होते, यापुढील जग हे कोरानापूर्वीचे आणि पश्चात या दोनच भागात विभागले जाईल. कोरोनापूर्वीच्या जगात जवळपास २० वर्षे तरुणांना इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रातच करियरच्या संधी दिसून येत होत्या. आरोग्य क्षेत्रात फक्त डॉक्टर (मेडिकल) सोडले तर इतर क्षेत्राला दुय्यम दर्जा मिळत होता. फार्मसी (औषधनिर्माण शास्त्र), नर्सिंग (आरोग्यसेविका) आणि संशोधन या क्षेत्रांना खूपच दुय्यम दर्जाचे करिअर म्हणून पहिले जात होते. इतर क्षेत्रात असणाऱ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर आरोग्य क्षेत्रात मात्र फारच कमी आहे. कोरोनानंतरच्या जगात मात्र याच क्षेत्रात सर्वाधिक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होणार आहेत. २०२२च्या सुरवातीपासूनच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मशिन लर्निंगचा दुसरा आविष्कार टेलिमेडिसिनच्या रूपात आपल्याला दिसून येईल.

रुग्णांना घरच्या घरी वेगवेगळ्या आजारांवर औषधे आणि उपचार उपलब्ध करण्यासाठी टेलिमेडिसिनचा वापर झालेला दिसून येईल. याचा फायदा मधुमेह, अर्धांगवायू यासारख्या रुग्णांना होईल. आणि यासाठी मेडिकलची कोणतीही डिग्री घेण्याची गरज लागणार नाही. अगदी बीकॉम झालेला एखादा विद्यार्थी आवड म्हणून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा मशिन लर्निंग शिकून याचा टेलिमेडिसीन क्षेत्रातील उपयोग यावर एखादी स्वतःची स्टार्टअपही करू शकेल. कोरोनामुळे अनेक प्रकारचे आजार असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचार मिळू शकले नव्हते, भविष्यातही परिस्थिती अशीच राहू शकते त्यावेळी टेलिमेडिसीन हे एखाद्या संजीवनीसारखे उपयोगी ठरणारे आहे. युरोपियन देशांमध्ये २०२१मध्ये टेलिमेडिसिनचा वापर ३८ टक्क्यांनी वाढला आहे आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधी अनेकपटीने वाढल्या आहेत.

अमेरिका आणि युरोपमध्ये २०२२ मध्ये १० लाखापेक्षा अधिक नोकरीच्या संधी या क्षेत्रात निर्माण होत आहेत. त्यादृष्टीने जगाला तरुण मनुष्यबळाची गरज लागणार आहे. तातडीच्या, कमी-जटिलतेच्या समस्यांसाठी-खोकला, सर्दी, याचबरोबर फ्ल्यू सारख्या साधारण आजारांसाठी टेलिमेडिसीन म्हणजेच आरोग्याची आभासी काळजी वापरली जाणार आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी एकात्मिक क्रॉनिक-डिसीज मॅनेजमेंट किंवा चालू वर्तणूक-आरोग्य थेरपी याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याच टेलिमेडिसिनमुळे लोकांना हॉस्पिटल तसेच डॉक्टरांच्या कार्यालयात आणि उपचारासाठी घराबाहेर सतत प्रवास करण्याची गरज लागणार नाही. लोकांची आभासी प्रकारची जितकी जास्त काळजी घेतली जाईल तितकेच रुग्णांचे रोगाचे ओझे कमी होईल. ही एक करिअरची नवीन संधी आहे जी प्रत्येकाला, विशेषतः सर्वसामान्य लोकांना सर्वांत सुरक्षित आणि परवडणारी असेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top