करिअर ‘ती’चे : स्पर्धा शालेय जीवनातील... 

डॉ. सुलभा नितीन विधाते
Wednesday, 13 January 2021

या सर्व परीक्षांना शालेय स्तरावर काही मुली बसत नाहीत, कारण जास्त अभ्यास करावा लागतो; परंतु पदवी परीक्षेनंतर नोकरीची वाट धरू म्हटल्यास विविध परीक्षा वाटेवर उभ्या असतात.

आपण मागील लेखामध्ये पाहिले की, इयत्ता दहावीपर्यंतचा प्लॅटफॉर्म सर्व मुलींसाठी सारखाच असतो, मात्र या प्रवासात कोणकोणत्या परीक्षा असतात, त्यासाठी काय करावे लागते हे आपण पाहू. मुलींना शालेय जीवनात पहिली स्पर्धा कोणती असेल, तर इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा. या परीक्षेसाठी खूप परिश्रम घेतले जातात. इयत्ता पाचवीप्रमाणेच इयत्ता आठवीलाही शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षा शासनामार्फत घेतल्या जातात. सर्व शाळा याबाबत दक्ष असतात, कारण स्कॉलरशीपच्या परीक्षांमधील शाळांचे यश हे प्रगतीचे नामांकन असते. पाल्यांना या परीक्षांना जरूर बसवावे. पाचवीला गणित प्रावीण्य, कौशल्य, संबोध, प्रज्ञा परीक्षा, सहावीला डॉ. होमी भाभा बाल विज्ञान परीक्षा, आठवीला स्कॉलरशिप व प्रज्ञा शोध परीक्षा व नववीला डॉ. होमी भाभा विज्ञान परीक्षा आणि मग दहावीला बोर्डाची परीक्षा असा परीक्षांचा चढता क्रम असतो. ही झाली परिचित असलेल्या स्पर्धा परीक्षांची माहिती. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्पर्धा परीक्षा आवश्‍यकच 
या सर्व परीक्षांना शालेय स्तरावर काही मुली बसत नाहीत, कारण जास्त अभ्यास करावा लागतो; परंतु पदवी परीक्षेनंतर नोकरीची वाट धरू म्हटल्यास विविध परीक्षा वाटेवर उभ्या असतात. त्या तर द्याव्याच लागणार, म्हणूनच शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. या परीक्षांच्या अभ्यासासाठी मुलींची मानसिकता आवश्‍यक आहे. यात सकारात्मक प्रवृत्ती, परिश्रम, परीक्षेचे तंत्र व चिकाटी या गुणांची गरज आहे. त्यासाठी आई-वडील व शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची आहे. ‘मुलगीच आहे, काय करायचे आहे, या इतर परीक्षांना बसून?’ अशी काही पालकांची प्रतिक्रिया असते. हे सर्वार्थाने चुकीचे असते. माझ्या अनुभवानुसार, काही परीक्षांसाठी विद्यार्थिनीच्या बुद्धीची चमक पाहून पालकांना मार्गदर्शन करावे लागते. मुलींचे कौटुंबिक व शाळेतील वागण्यात फरक आढळतो. शाळेत समवयस्क मैत्रिणीसोबत अध्ययन करताना अनेक अंगभूत गुणांना वाव दिला जातो. ते गुण विकसित करण्यासाठी शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. कधी पालकांना समुपदेशन करणे, तर कधी मुलींना तिच्या क्षमतेची जाणीव करून देणे महत्त्वाची पायरी असते. एक विद्यार्थिनी इयत्ता पाचवीला स्कॉलरशीपला बसली होती; परंतु थोडक्‍या गुणाने तिची स्कॉलरशिप हुकली. ती अतिशय नाराज झाली. यावेळी आई-वडील व शिक्षकांची भूमिका तिला सावरण्याची होतीच, शिवाय नव्या उमेदीने पुढील इयत्तेतील स्पर्धा परीक्षेला बसविण्याची तयारी करणे गरजेचे होते. आपण कुठे कमी पडलो, परीक्षेचे तंत्र चुकले, लेखनाचा सराव कमी झाला की परीक्षा प्रश्‍नपत्रिकांचा सराव कमी ला? यातूनच ‘ती’चा आत्मविश्‍वास वाढतो. छोट्या टप्प्यावर अपयश आले तरी नव्या उमेदीने लढण्याचे तंत्र मुलगी शिकते. आम्ही तेच केले. तिचे मनोबल वाढले व सहावी ते दहावीमध्ये ती विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चमकतच राहिली. 

शालेय जीवनातील या अभ्यासपद्धती तिच्या पुढील व्यक्तिमत्त्वाचा पाया ठरतात. सुरवातीपासूनच योग्य मार्गदर्शन असल्यास पुढील करिअर उज्ज्वल ठरते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr sulbha vidhate write Competition in school life