करिअर ‘ती’चे : संधी साहसी खेळांतील...

डॉ. सुलभा नितीन विधाते
Wednesday, 24 February 2021

आपण मागील लेखात सर्वसाधारण खेळ आणि त्यातील संधींचा अभ्यास केला. आता आपण काही साहसी खेळ पाहू. साहसी खेळांत ॲथलेटिक्स, रायफल शूटिंग, आर्चरी, योगासने, रोप मल्लखांब, कराटे, मार्शल आर्टसचे ६ ते ७ प्रकार, अश्‍वारोहण इत्यादी खेळांचा समावेश होतो. सर्वसाधारण शाळांमध्ये हे खेळ घेतले जात नाहीत.

आपण मागील लेखात सर्वसाधारण खेळ आणि त्यातील संधींचा अभ्यास केला. आता आपण काही साहसी खेळ पाहू. साहसी खेळांत ॲथलेटिक्स, रायफल शूटिंग, आर्चरी, योगासने, रोप मल्लखांब, कराटे, मार्शल आर्टसचे ६ ते ७ प्रकार, अश्‍वारोहण इत्यादी खेळांचा समावेश होतो. सर्वसाधारण शाळांमध्ये हे खेळ घेतले जात नाहीत. म्हणून पालक आपल्या पाल्याचा कल व आवड पाहून संध्याकाळच्या वेळेत शाळेव्यतिरिक्त खासगी मार्गदर्शनाखाली या खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी क्लास लावतात. पण ती केवळ एक ‘आवड’ राहते. या आवडीचे रूपांतर ‘संधी’ किंवा ‘नोकरी’ किंवा ‘व्यवसाया’चा मार्ग होणे गरजेचे आहे. ते होत नाही, असे चित्र दिसते. साधारणपणे सैनिक शाळांमध्ये हे सर्व खेळ घेतले जातात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साहसी खेळांना शासन देखील प्रोत्साहन देते आहे. उदा. मुलींसाठी गिर्यारोहण या क्षेत्रात. म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेने २००१मध्येच दमदार पाऊल टाकले आहे. दरवर्षी इयत्ता आठवीच्या कॅडेट धर्मशाला येथे ॲडव्हेंचर कोर्ससाठी व इयत्ता दहावीच्या कॅडेट मनाली येथे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्ससाठी जातात. 

सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी या नियमित कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, रायफल शूटिंग, आर्चरी, योगासने, रोप मल्लखांब, मार्शल आर्ट्स, अश्वारोहण आदी खेळांचा सराव करताना रायफल शुटिंगमध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत. ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट, आर्चरी या खेळांमध्येही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. राज्यस्तरीय अश्‍वारोहण स्पर्धेत अकरापेक्षा अधिक पदके मिळवली आहेत. आजवर सैनिक शाळेतील १५०पेक्षा अधिक मुली राज्यस्तरीय स्पर्धेत व ३५ पेक्षा अधिक मुलींनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन पदके मिळवली आहेत. ४ बाय १०० मीटर रिले धावणे या राज्यस्तरीय पदक विजेत्या संघातील प्रणिता मोरे व आर्चिस सबनीस या भारतीय सैन्यदलात एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर, आर्चरीची खेळाडू दामिनी देशमुख नुकतीच वायुसेनेत अधिकारी म्हणू प्रशिक्षण घेत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मुलींसाठी खेळाडू म्हणून क्रीडा व शारीरिक शिक्षण या क्षेत्रांत बऱ्याच व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. उदा. १) स्पोर्ट्स मेडिसीन २) क्रीडा शिक्षक, क्रीडा संचालक ३) फिजिओलॉजिस्ट ४) आहारतज्ज्ञ ५) पर्सनल ट्रेनर ६) रेकॉर्ड्स टेक्निशियन ७) नॅशनल टीम डायरेक्टर ८) पंच ९) क्रीडा पत्रकार १०) फोटोग्राफर ११) कॅमेरा ऑपरेटर १२) क्रीडा समुपदेशक १३) समालोचक १४) तांत्रिक व व्यवस्थापकीय संचालक १५) फिटनेस सेंटर डायरेक्टर १६) वकील १७) कार्यक्रम व नियोजन संचालक १८) एरोबिक्स इन्स्ट्रक्टर आदी. अशा अनेक संधी आज मुलींसाठी खेळाद्वारे प्राप्त होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे, खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावरही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचा आपला अनुभव पणाला लावता येतो. याच आदर्श उदाहरण म्हणजे सुवर्णकन्या पी. टी. उषा. 

भारतीय क्रीडा संस्कृतीची जोपासना करून आपल्या देशाला ऑलिंपिकमध्ये अधिकाधिक पदके महिला खेळाडू मिळवून देतील यात कोणतीही शंका नाही.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Sulbha Vidhate Writes about Girls Career Mountaineering