esakal | ‘अ’ ऑनलाइनचा : शिक्षण ‘हायब्रीड’ व्हावे...
sakal

बोलून बातमी शोधा

Line Learning

‘अ’ ऑनलाइनचा : शिक्षण ‘हायब्रीड’ व्हावे...

sakal_logo
By
डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

ऑनलाइनचा सकारात्मकच विचार करायचा झाला, तर ती एक नवीन अशी शिकवण्याची पद्धतीच उदयाला आली असे म्हणावे लागेल. तो पर्याय म्हणून सर्वकाळ वापरता येणे योग्य होणार नाही. ‘आलिया भोगासी..’ म्हणून त्याला आपण स्वीकारले खरे. परंतु आता पुढे जाऊन शाळा नव्याने सुरू होतील, अर्थात ऑफलाइन पद्धतीने म्हणजे प्रत्यक्षात सुरू होतील, तेव्हा हे नव्याने हाती आलेले तंत्रज्ञान पूर्णपणे विसरून न जाता त्याचा वापर सुरू ठेवलाच पाहिजे. या सर्व शिक्षणातील बदलांची जाणीव शिक्षकांनी करून घेतली पाहिजे तशीच ती विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि समाजानेही समजून घेतली पाहिजे. शिक्षण क्षेत्र हे कात टाकायला तयार झाले आहे. त्यासाठीच भविष्याचा वेध घेऊन बघू या.

संमिश्र शाळा शक्य

शाळा कोणत्या स्वरूपात सुरू होतील याचा अंदाज दोलायमान आहे. गर्दी होऊ नये म्हणून कदाचित सर्व वर्गांना एकदम न बोलवता विद्यार्थी एक दिवसाआड बोलवले जाऊ शकतात. मुले एके दिवशी, तर मुलींना दुसऱ्या दिवशी बोलवले जाऊ शकते. अशा अनेक शक्यता वर्तवता येतील. परंतु अशा वेळेस प्रत्यक्ष हजर असणाऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने आणि घरी असणाऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने असे शिकवत राहावे लागेल. शाळा पूर्ण स्वरूपात सुरू झाल्या तरी त्यांच्या वेळा कमी होऊ शकतात. म्हणून मग हायब्रीड स्वरुपातील ऑनलाइन-ऑफलाइन अशा संमिश्र पद्धतीचा वापर करावा लागेल.

सवय स्वयंअध्ययनाची

शिकवण्यातील ऑडिओ, व्हिडिओचा, पॉवर पॉइंटचा अनुभव, विविध वेबचा अनुभव, मार्गदर्शित व्याख्याने, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही ऑनलाइन शिकवण्यातील शक्यता आहे. प्रत्यक्ष वर्गात वापरल्या जात नव्हत्या अशा अनेक गोष्टी ऑनलाइनमुळे शक्य झाल्या आहेत. आता हेच प्रत्यक्ष वर्गाध्यापनात कसे आणता येईल याचा विचार करावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने शिकणाऱ्या मुलांमध्ये बैठक वाढली, शिकण्याबद्दलची जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. अभ्यासातील एकाग्रता वाढली, तसेच स्वयंअध्ययनाची एक चांगली सवय लागली. पुढे जाऊन लागणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी ऑनलाइन मूल्यमापनामुळे झाली.

अभ्यासाचा बॅगलॉग भरण्याचे उपाय

एकतर प्रत्येक विषयातून वाढलेली व्याप्ती अभ्यासाचे ओझे आणि सतत वाढणारी स्पर्धा यांना तोंड देण्यास विद्यार्थ्यांना तयार करायचे असेल तर संमिश्र पद्धतीचा उपयोग करणे क्रमप्राप्तच ठरते. एवढेच नाही, तर शिक्षणाचा मागील दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा असल्यास अशा नव्या पद्धतीला स्वीकारावे लागेल. प्रत्यक्ष भेटीत काय आणि कसे शिकवावे, तर ऑनलाइन पद्धतीने कशावर भर द्यावा हे समजूनच शिक्षकांना पुढे जावे लागेल. ऑफलाइनमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी शिकण्याची तंत्रे आत्मसात करायला मुलांना शिकवावे लागेल. शिकायचे कसे त्याची प्रक्रिया मुलांना समजली पाहिजे. केवळ परीक्षांसाठी तयार करणे असा शिकवण्याचा मर्यादित अर्थ बाजूला सारून मुलांच्या अभ्यासाला त्यांच्या सवयींना वळण लावणे ही काळाची गरज आहे. परत एकदा जुन्याच पद्धतीने आपण शिकवायला लागलो तर मात्र विद्यार्थ्यांची आणि समाजाची निराशा होणार आहे. यासाठी होणार बदल त्यातील वेगळेपण शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे. मुलांना शिकत बनवलं पाहिजे.

अध्ययनाची/शिकण्याची तंत्रे काय आहेत, अभ्यास कसा करायचा याची तंत्रे पुढील लेखापासून. वाचा आणि आत्मसात करा.

loading image
go to top