‘अ’ ऑनलाइनचा : ऑनलाइन शाळा आणि प्रगती

शिकणे ही तुमची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आपण शिकतो ते आपल्या शाळेतल्या शिक्षकांसाठी किंवा शाळेसाठी नाही. आपल्या आई-वडिलांसाठीही नाही.
Online School
Online SchoolSakal

शिकणे ही तुमची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आपण शिकतो ते आपल्या शाळेतल्या शिक्षकांसाठी किंवा शाळेसाठी नाही. आपल्या आई-वडिलांसाठीही नाही. आपण शिकतो आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी, भविष्यासाठी. मग आपणच स्वतः शिकणे गांभिर्याने घ्यायला हवे, नाही का?

काय शिकायचे हेच समजत नाही?

प्रत्येक विषयातील आशय पाठ करत बसण्यापेक्षा संकल्पनांचा पाया पक्का करा. या संकल्पनाच तुम्हाला आयुष्यभर परत परत भेटत राहतील. या ऑनलाइनचा एक जबरदस्त फायदा, म्हणजे तुम्ही सर्व एक महत्त्वाचे कौशल्य आत्मसात करणार आहात. ते म्हणजे स्वयंअध्ययन. स्वतःला स्फूर्ती कशातून मिळते, ते पाहा. प्रत्येक विषयात असणारी आवश्यक कौशल्ये आणि क्षमता यांच्या विकसनावर लक्ष द्या.

अभ्यास कसा करायचा तेच कळत नाही?

यासाठी स्वतःची उद्दिष्टे ठरवा, स्वप्ने पाहा. ती साकारण्यासाठी स्वयंशिस्त, स्वतःला वाहून घेण्याची वृत्ती जोपासा. जिद्द, अधिक प्रयत्न अधिक सरावासह शिक्षण हे सूत्र लक्षात ठेवा. एकलव्याचे उदाहरण तुम्हाला माहितीच असेल. मग हे असे शिकणे तुम्हालाही शक्य होईल. हो, पण शिक्षकांच्या सतत संपर्कात राहा अन् आपल्या शंकांचे निरसन करून घ्या.

ऑनलाइन अभ्यासात लक्षच लागत नाही?

त्यासाठी चिकाटी हवी, बैठक हवी. एकाच जागी बसायचा कंटाळा येतो ना, मग जागा बदलती ठेवा. तास रेकॉर्ड करून मग सोईने पाहिजे तेवढेच पाहा, ऐका. आपले लक्ष विचलित होईल अशा जागी बसू नका. शाळा आता तुमच्या घरात नव्हे, तर तुमच्या हातातच आली आहे. तो शाळेत बसल्याचा आनंद कल्पनेतूनच मिळवा.

ऑनलाइन शिकण्याचा ताण येतो?

जीवनात पुढे जायचे असल्यास काही ताण आवश्यकच असतात. आपल्या मनाला, शरीराला आपण या सकारात्मक दबावाखाली ठेवल्यास ते आळशी बनलेच म्हणून समजा. या ताणामुळे आपण अभ्यासाला लागतो, विचार करायला लागतो. सारखाच आराम आणि करमणूक असल्यास त्याचीच सवय होऊन जाते. ताण घ्या अन् त्याच्याशी दोन हात करा. त्यातून बाहेर पडल्यावर तुम्हालाच आनंद होईल.

ऑनलाइनमुळे शारीरिक नुकसानाचे काय?

ऑनलाइन अभ्यास करताना डोळे दुखायला लागतात अन् पाठ मोडून निघते. मग मोबाईल हातात न घेता दूर ठेवूनच ऐका किंवा पाहा. सतत मोबाईलकडे पाहायला कुणी सांगितले आहे. ऐकूनही अनेक गोष्टी समजून घेता येतात. खेळ आणि व्यायाम महत्त्वाचा, तो सोडून कसे चालेल? आता शाळेतल्या पेक्षा ऑनलाइनला कमीच वेळ द्यावा लागतोय ना? आपले छंद जोपासायलाही वेळ मिळतोय. मग अशातच मन रमवा जरा

अभ्यासाचा कंटाळा येतो, त्याचे काय?

अभ्यास करण्याच्या तंत्रात बदल करा. वाचा, लिहा, पाहा, ऐका... असे बदलत राहा. घरातला वेळ चांगला जावा म्हणून छंद जोपासा, आवड निर्माण करा. ते तुम्हाला जन्मभर पुरेल. वेळ कसा जातो हे कळणारही नाही.

- डॉ. उमेश दे. प्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com