esakal | ‘अ’ ऑनलाइनचा : शिकविण्याची आणि शिकण्याची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

Learning

‘अ’ ऑनलाइनचा : शिकविण्याची आणि शिकण्याची तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ऑनलाइन शिक्षण घरबसल्या सुरू ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाशी दोस्ती करायला हवी. त्याच्या अपेक्षा समजून नको का घ्यायला? त्याचा स्वभाव जाणून घेतला तरच हे तंत्रज्ञान तुम्हाला हवी ती मदत करेल. तंत्रज्ञानाला नावे ठेवू नका उगाच. त्याचा आपण कसा काय उपयोग करतो यावरच सगळे अवलंबून आहे. थोडी या दोस्ताविषयी माहिती शिक्षकांना, पालकांना अन् विद्यार्थ्यांना असलीच पाहिजे. वर्षभर आपले शिकण्या-शिकविण्याचे काम सहज, सोपे, आनंददायी व्हावे यासाठी हे महत्त्वाचे. आता शाळा आपल्या घरातच आली आहे, तुम्हाला भेटायला, शिकवायला. या ऑनलाइन शिक्षणासाठी आपल्याला अंदाजे कमीत कमी खर्च येईल सहा ते सात हजार!

मोबाईल कसा असावा...

ऑनलाइन शिक्षणासाठी किमान शिक्षक व विद्यार्थ्यांकडे काही साधनसामग्री असणे गरजेचे आहे. त्यात मुख्य म्हणजे स्मार्टफोन. तो एकदाच घ्यावा लागणार. तो घेताना ३२ गिगा बाईट्स (जीबी) माहिती साठवण क्षमता असणारा असावा. तसेच त्याचा रॅम, म्हणजे माहिती डाउनलोड करण्याची क्षमता किमान दोन जीबी असली पाहिजे. या मोबाइलचा खर्च कमीतकमी सहा हजार येईल. त्यावर इंटरनेट जोडणीसाठी किमान रोजचा दीड ते दोन जीबी डेटा असणारा व तुमच्या विभागात चांगली कनेक्टिव्हिटी असणारा पॅकेज घ्यावा लागणार. त्याचा खर्च साधारण दोनशे रुपये प्रत्येक महिन्याचा असेल. आजूबाजूचे आवाज ऐकू येऊ नयेत आणि शिक्षक काय सांगत आहेत, हे समजावे म्हणून कानात घालून ऐकता येतील असे मायक्रोफोन असल्यास जास्त उत्तम. त्याचा खर्च तुम्ही कराल तसा अगदी पन्नासपासून पाचशे रुपये किंवा जास्त. तसेच, आपला हा नवा दोस्त एका जागी स्थिर राहावा व आपले हात लिहायला मोकळे राहावेत यासाठी स्टँड घेतल्यास जास्त चांगले. ही झाली आपली ऑनलाइन शाळेची तयारी. हो, शिक्षकांकडे मात्र तास घेण्यासाठी लॅपटॉप किंवा संगणक असल्यास जास्त चांगले.

डेटा वापर जरा जपूनच!

आता हेही लक्षात घ्या, आपला मोबाईल आपण दिवसातील तीन ते चार तास ऑनलाइन शिकण्यासाठी वापरल्यास आपल्याला हा दीड ते दोन जीबीचा डेटा असणारा पॅकेज चालेल. मात्र, व्हॉट्सॲप, इतर करमणुकीसाठी वापरत बसलात तर डेटा संपणार आणि तुमचा फोन त्या दिवशी प्रॉब्लेम निर्माण करणार, हेही लक्षात ठेवा. तुम्ही विविध ॲप पाहता, ब्राउज करता तेव्हा तुमचे डाउनलोडिंग सुरू होते. मग ओरडत बसू नका, माझा डेटा कसा संपला म्हणून. कामापुरता मोबाईल वापरून इतर वेळेस डेटा ऑफ करायला विसरू नका.

आपल्या या नव्या दोस्ताबरोबर दोन हात करताना काही कौशल्ये आत्मसात करावी लागतील. टचस्क्रिन असल्याने केवळ छोट्याशा स्पर्शानेही हा दोस्त रुसतो बरंका! आपल्या ई-मेल (पत्ता) ॲड्रेस तयार करावा लागेल. त्याचा आयडी आणि पासवर्ड नीट लक्षात ठेवावा लागेल. आवश्यक ॲप्स तुमच्या दोस्ताच्या डोक्यात भरवावी लागतील. त्याचा उपयोग तुम्हाला शिकण्यासाठी करावा लागणार आहे. तर मग आता तुमची ऑनलाइन शिकण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाली. आता आपण सुरुवात करू शकतो आपल्या ऑनलाइन शाळेला. ती बघा तुमच्या नव्या दोस्ताने दिली रिंग. करा ऑन!

- डॉ. उमेश दे. प्रधान

loading image