हटके : व्यवसाय निवडीतील अडथळे

‘व्यवसाय पाहावा करून. अहो, व्यवसाय हा रक्तात असावा लागतो. कुणीही उठून व्यवसाय करू शकत नाही.
Business Choice
Business ChoiceSakal

- डॉ. उमेश दे. प्रधान

‘व्यवसाय पाहावा करून. अहो, व्यवसाय हा रक्तात असावा लागतो. कुणीही उठून व्यवसाय करू शकत नाही. व्यवसाय करावा ना तर...’ अशी अनेक सल्ला देणारी, धोक्याचा इशारा देणारी वाक्ये तुम्ही ऐकली असतील. यामुळे तुमचा सगळा उत्साहच पाण्यात गेला असेल. मात्र, अशा सगळ्या निरुत्साही वातावरणातही जिद्दीने उभं राहायला हवं, स्वतःला सिद्ध करायला हवं. तरच तुम्ही प्रसिद्ध व्हाल. तुम्हाला व्यवसाय करता येईल.

जमिनीवर राहून विचार करावा हे खरं आहे, परंतु त्याबरोबर उंच भरारी घेणं सोडायचं नाही. जरा हटके विचार, कृती झालीच पाहिजे. सरधोपट, सुरळीत मार्गक्रमण करत राहण्यात विकास आणि यश कितपत असेल? येणाऱ्या अडथळ्यांची एकदा का जाणीव झाली की, ती पार पाडायला आपल्याला सज्ज होता येईल.

कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभाव असेल तर, केवळ स्वप्न पाहून उपयोग नाही. तुम्ही स्वतः त्या क्षेत्रात काम करून ती कौशल्यं आत्मसात करा. पैशांअभावी सारं काही असंभव असतं. त्यामुळे व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उभं करणं हा अडथळा पार करण्यासाठी अनेक पातळीवर मदत करणारी मंडळी असतात. असे लोक डोळे उघडे ठेवून शोधा. मग तुमच्या लक्षात येईल की, अनेक जण तुम्हाला भांडवल द्यायला तयार आहेत.

व्यवसायासाठी लागणारी जागा आणि मनुष्यबळ यांची कमतरता हाही एक आवश्यक घटक असतो. त्याची तजवीज आपण कशी करणार आहोत, याचा विचार आधीच करा. आपल्याकडे बेरोजगारी वाढते आहे, असं एकीकडे म्हटलं जातं आणि दुसरीकडे, कुशल कामगारांची कमतरता जाणवते. त्यामुळे ही वास्तविकता समजून घ्यायला हवी.

सरकारी परवानगी हा व्यवसाय करण्यामागील सर्व उत्साह दूर करणारा घटक ठरू शकतो. त्यासाठी अशा अनेक परवानग्यांचा अभ्यास सुरुवातीलाच व्हायला हवा. बेकायदेशीर बाबींपासून दोन हात लांब राहिलेलं अंतिम यशासाठी आवश्यकच असतं. सुरुवातीलाच आपण सुखविलासी स्वप्न पाहू लागलो तर, ती नक्कीच भंग पावतील. त्यासाठी ‘आराम हराम है’ हे मनाशी पक्कं केलं पाहिजे. आजची मेहनत ही उद्याच्या सुख आणि शांततेची खात्री असते.

प्रतिस्पर्धी हा व्यवसायाच्या विकसातील कळीचा घटक असतो. स्पर्धेला अडथळा न समजता सुधारणेस वाव आहे, असं समजावं. कामाला प्रोत्साहन देण्याचं कामच या स्पर्धेतून होतं. नियोजनाचा अभाव असल्यास व्यवसाय सुरू होण्याअगोदरच तो कोसळेल, हेही ध्यानात ठेवा. प्रत्येक कामाच्या वेळेची मर्यादा जाणून घ्या आणि त्या प्रमाणे नियोजन करा.

व्यवसाय म्हटलं की, ‘रिस्क फॅक्टर’ आलाच. सगळ काही आपल्या मनासारखं होईल असं शक्य नसतं. आपल्या अवती-भोवतीचे अनेक अडथळे ‘रिस्क फॅक्टर’ ठरू शकतात, हे गृहीत धरूनच तुम्हाला प्रत्येक पाऊल टाकावं लागेल. आपल्या समोर कोणाला तरी आदर्श ठेवून वाटचाल करा. वेळोवेळी योग्य व्यक्तींचा सल्ला घेण्यास मागे-पुढे पाहू नका.

या सर्व अडथळ्यांचा विचार करून कृती केली तर, ही शर्यत तुम्ही नक्कीच जिंकाल. अर्थात, तुम्हाला हे सांगणं माझ्यासाठी खूप सोपं आहे, पण शेवटी हे शिवधनुष्य तुम्हालाच पेलायचं आहे, हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com