संवाद : निर्णय घेण्यापूर्वी हे कराच

ज्यावर आपले भविष्य आकारणार आहे तो निर्णय आपण कसा घेतो? आयुष्याला कलाटणी देणारा, दिशा देणाऱ्या अशी शाखा, करिअर, संस्था इत्यादी विषयाची निवड आपण कोणत्या निकषांवर करतो?
संवाद : निर्णय घेण्यापूर्वी हे कराच
Summary

ज्यावर आपले भविष्य आकारणार आहे तो निर्णय आपण कसा घेतो? आयुष्याला कलाटणी देणारा, दिशा देणाऱ्या अशी शाखा, करिअर, संस्था इत्यादी विषयाची निवड आपण कोणत्या निकषांवर करतो?

Two roads diverged in a wood and I

I took the one less travelled by,

And that has made all the difference.

- Robert Frost

या विख्यात कवितेत आयुष्यातील योग्य निवड करण्याचं महत्त्व अधोरेखित केले आहे. जंगलात जाताना दोन दिशांनी फुटणाऱ्या पाऊलवाटा दिसल्या. त्यातीलच एक कमी रुळलेली वाट मी निवडली आणि त्याने माझ्या जगण्यात सर्व फरक केला. कमी रुळलेले असे मार्गच जीवनात स्वतःचा ठसा उमटवण्यास मदत करतात.

ज्यावर आपले भविष्य आकारणार आहे तो निर्णय आपण कसा घेतो? आयुष्याला कलाटणी देणारा, दिशा देणाऱ्या अशी शाखा, करिअर, संस्था इत्यादी विषयाची निवड आपण कोणत्या निकषांवर करतो? आवश्यक त्या निष्कर्ष कोणत्या तत्त्वांच्या आधारे आपण घेत असतो? या सर्व निर्णय प्रक्रियेला आवश्यक असणारे कौशल्य, क्षमता आपण प्राप्त केल्या आहेत का? एकदा का बाण हातातून निसटला की तो परत माघारी घेणं अवघडच. या सगळ्याचा विचार करणं ही प्रथम आवश्यक बाब. त्या अनुषंगाने पुढील काही क्षमता समृद्धी गुणांचा विकास आपण करून घेतला आहे का हे पहाणे आवश्यक.

सदसद्‌विवेक बुद्धी

कोणताही निर्णय हा सारासार विचार करून मगच घेतलेला असावा. निर्णय किंवा निवड करताना ती शहाणपणाने आणि विचारपूर्वक केलेली कृती असली पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे निर्णय घेणं ही प्रक्रिया बौद्धिक आहे, ती मानसिक आणि भावनिक नाही हे जाणून घेतला पाहिजे. प्रत्येक निर्णय हा योग्य-अयोग्य, फायदे-तोटे, अशा ऐरणीवर तपासून पाहिलेला असावा. निर्णय घेताना काय डोकं गहाण ठेवलं होत का? असं नंतर कुणी म्हणायला नको.

तार्किकता

कार्य कारण भाव हा तार्किकतेत महत्त्वाचा. सहज सांगायचे झाले तर, काय केले असता काय होईल याचा केलेला विचार. स्वतःच्या मनाला अनेक प्रश्न विचारून त्याला आपल्याला समाधान मिळेल असे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत केलेला विचार आवश्यक. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, तार्किक विचार निष्कर्ष किंवा समाधानापर्यंत पोहोचण्यासाठी तथ्ये आणि पुरावे यावरून घेतलेला निर्णय. तुमच्या विचार प्रक्रियेत तर्क आणि वितर्क या दोन्हींचा वापर करायला हवा.

चौकटीबाहेरचा विचार

केवळ चाकोरीबद्धपणे विचार न करता जरा वेगळा विचार करून पाहिला तर आपल्या योग्य दिशा सापडल्याचा आनंद मिळेल. सगळे ज्या विचारांनी जात आहेत त्याच विचारांचा पाठपुरावा करण्यात काहीच हाशील नाही. प्रवाहापेक्षा वेगळा विचार महत्त्वाचा. स्वतःभोवती अदृश्य परंपरांची भिंत बांधून आपण स्वतःची आणि इतरांची प्रगतीही साधू शकत नाही. जरा पलिकडे जाऊन विचार केलात तर नवी दिशा गवसेल. तसा शोध मात्र घ्यायला हवा.

भविष्यवेध

भविष्यात आपल्याला काय व्हायचं आहे याचा विचार आजच करणे गरजेचे आहे. स्वतःला त्या स्थानी पाहणं आवश्यक आहे. मी काय करू शकतो याची जाणीव जोपासून त्याचे पुढे काय उपयोग होणार आहे हा विचार महत्त्वाचा. इतिहासात रमून न रहाता, वर्तमानात जगून भविष्याचा वेध घेता येणं आवश्यक. स्वतःला आरशात बघून योग्य काय ते ठरवा.

दिवास्वप्न

स्वप्न पहाणं अर्थात कल्पना करणं गरजेचं असतं. त्यातूनच दिशा गवसत असते. अशी स्वप्न जी प्रत्यक्षात आणता येणं शक्य आहे. तरच जगण्याच्या धडपडीला सुरुवात होते. अन्यथा आपण आहे त्यात अल्पसंतुष्ट होऊन जातो. अस्वस्थ करतं ते स्वप्न. ते साकारण्यासाठी सर्व आटापिटा.

ध्येयनिश्चिती

जगताना आपली ध्येय नक्की केलेली असली पाहिजे. जवळची आणि दूरवरची अशी उद्दिष्टे नक्की असतील तर जीवनाचे ध्येय गाठणे सहज होते. पण ध्येय नसलेलं जीवन म्हणजे किनारा नसलेली नौकाच.

माहिती संपादन

निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आवडणाऱ्या करिअर, शाखा, कॉलेज विषयी जास्तीत जास्त माहिती मिळवा. संशोधक वृत्तीने मिळालेल्या माहितीचे पृथक्करण, विश्लेषण करा, त्यातील काय सोडायचं आणि काय घ्यायचं ते ठरवा. अर्धवट माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय धोक्याचा.

लक्षात ठेवा आपण कोणताही निर्णय घेतला तरी तो महत्त्वाचाच असणार. समाजाला केवळ इंजिनिअर, डॉक्टर, संगणक तज्ज्ञ नको असतात, तर हवे असतात सक्षम शिक्षक, कौशल्यपूर्ण कामगार, कर्तव्यदक्ष अधिकारी, सुजाण नागरिक. ते बनण्यासाठी शुभेच्छा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com