संवाद : चांगल्या अभ्यासाची सवय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Study

अभ्यास चांगला, अर्थपूर्ण व्हावा यासाठी अभ्यासपूरक अन्य बाबीपण तितक्याच महत्त्वाच्या असतात. एकतर अभ्यास हा कधीच एकदम, जोरात, थोडक्या वेळात वगैरे होत नसतो.

संवाद : चांगल्या अभ्यासाची सवय

- डॉ. उमेश दे. प्रधान

अभ्यास चांगला, अर्थपूर्ण व्हावा यासाठी अभ्यासपूरक अन्य बाबीपण तितक्याच महत्त्वाच्या असतात. एकतर अभ्यास हा कधीच एकदम, जोरात, थोडक्या वेळात वगैरे होत नसतो. त्यासाठी वेळ द्यावाच लागतो. कासवाच्या गतीने अभ्यास करण्याकडे लक्ष दिले तरच अपेक्षित यश मिळू शकते, अन्यथा गोष्टीतल्या सशासारखी अवस्था होणार. जास्त वेळ अभ्यास केल्याने तो खरंच होईल अशी खात्री नसते. शांतपणे पुरेसा वेळ काढून कोणतीही घाई गडबड न करता सावकाशीने केलेला अभ्यास फायदेशीर ठरतो. चांगला अभ्यास व्हावा म्हणून स्वत-वर विविध प्रकारची नियंत्रणे, बंधने ठेवणे आवश्यक आहे. आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून लक्ष केंद्रित केल्यास अभ्यास चांगला होतो.

केलेल्या अभ्यासाचा अपेक्षित परिणाम साधायचा असल्यास फालतू आकर्षणांपासून सावध रहायला हवे. आपले लक्ष विचलित होईल अशा कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. खेळाच्या वेळेस खेळ आणि अभ्यासाच्या वेळेस अभ्यास. आजूबाजूला होणारे गाण्यांचे आवाज, खेळण्याचे होणारे आवाज आपले लक्ष विचलित करू शकते. अशा वेळेस मनावर ताबा मिळवणे महत्त्वाचे. अभ्यासात सातत्य राखणे गरजेचे असते. आठवड्याभराचा अभ्यास एकदम उरकून टाकू असे होत नाही. शरीराचा आणि मनाचा व्यायाम हा नित्य नियमाने करावा.

अभ्यासाची म्हणून एक ठराविक जागा असली तरी ती सतत बदलती ठेवणे फायद्याचे ठरू शकते. एकाच जागेचा कंटाळा येतो, मन लागत नाही. तसेच परीक्षेच्या वेळेस एकदम वातावरण, सभोवतालची परिस्थिती बदलली तर मग काहीच आठवेनासे होते. योगासने आणि व्यायाम याचे महत्त्व जाणून त्यासाठी रोजचा थोडावेळ काढला तर अभ्यासाचा येणारा ताण दूर होण्यास मदत होते. अभ्यासाच्या दरम्यान आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळा याकडेपण लक्ष द्यायला हवे. अति तिखट, तेलकट, अति गोड अन्नपदार्थ खाल्याने तब्येतीवर परिणाम होणार. त्यामुळे कंटाळवाणेपणा, झोप येणार, विश्रांती घ्यावीशी वाटणार. त्यात वेळ जाणार आणि दिवसही वाया जाणार. योग्य आहार आणि पुरेसे पाणी घेतल्याने प्रकृती चांगली राहील आणि अभ्यासपण चांगला होईल.

बदल हा माणसाला हवाहवासा असतो. त्यामुळे सतत, एकसारखा अभ्यासच करत बसायला पाहिजे असे नाही. उलट मन फ्रेश करण्यासाठी घराबाहेर जाऊन या, लांब फिरायला जा. एखादा खेळ खेळा, दीर्घ श्वसन करा. ताजे होऊन नव्याने अभ्यासाला बसा. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अभ्यासासाठी आवश्यक असते. पुरेशी झोप, विश्रांती घेतली नसल्यास अभ्यासाच्या कोणत्याही कृतीकडे दुर्लक्षच होईल. म्हणूनच अभ्यास करताना सलग बैठक मारून स्वत-ला शिणवून टाकण्याऐवजी अधूनमधून जरा ब्रेक घेतलेला बरा.

सतत अभ्यासाने मन थकून टाकणे योग्य होणार नाही. बदल म्हणून करमणूकही आवश्यक. डोक्याला अर्थात मेंदूला थकविण्यात अर्थ नाही. डोक शिणल्यास परीक्षेच्या वेळेस सर्व अभ्यास आठवणे गरजेचे आहे, तेव्हा चक्कर आल्यासारखे, गरगरल्यासारखे, मळमळल्यासारखे व्हायला लागल्यास काय उपयोग. सर्व मेहनत वाया जायची.

अभ्यास करताना आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव कसा येणार नाही हे पाहिले पाहिजे. मनावर दबाव नसेल तरच मेंदू अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल. नित्य चांगल्या सवयी यांचा सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे अभ्यासातील आनंद लुटायचा अनुभव घ्या. अभ्यास ही सवय, आवड किंवा छंद बनवा. बघा किती सोपे होऊन जाईल सर्व.

Web Title: Dr Umesh Pradhan Writes Good Study Habits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..