

- डॉ. उमेश दे. प्रधान
हटके म्हणजे काय हो? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. हटके विचार करणे यालाच ‘थिंकिंग बियॉन्ड द बॉक्स’ असे म्हटले जाते. म्हणजे चौकटीबाहेर, चाकोरीबाहेर जाऊन विचार करा. पण, अहो बॉक्स आणि चौकट आहेतच असे का समजायचे, इथूनच सुरुवात आहे. आपल्या विचारांना कृतीला कोणतीही मर्यादा न घालता मोकळेपणाने विचार केला की झाले ते हटके!
सगळे जण चाकोरीमय जीवन जगत असतात. त्याला सगळेच खूप कंटाळलेले असतात. अगदी रोजच्या तोच-तोचपणाला बोअर झालेले असतात. अर्थात, सध्या हे बोअर होण्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. त्यामुळे त्याला छेद देऊन बाकीच्यांपेक्षा वेगळे काही तरी करणे, स्वतःची वेगळी वाट तयार करणे जमले की त्यातच येतो तो हटकेपणा. इतरांची नक्कल न करता वेगळे केले की झाले. आपला व्यवसाय असो की नोकरी, आपण जे करतो आहोत त्यात वेगळेपणा आणलात ना तर सगळेच काही आनंददायी होईल.
हा वेगळा विचार कसा करायचा? असा प्रश्न लगेच मनात आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ठरवले की, काही तरी वेगळे, अनोखे करायचे तर मग ते नक्की शक्य आहे. त्यासाठी पहिली बाब म्हणजे, अजिबात इतरांचा विचार करत बसू नका. याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल, या फंदात पडू नका. तसे केले तर तुमचे विचार चौकटीत अडकलेच म्हणून समजा.
मनात येईल ते उतरवून ठेवा, दुसऱ्यांचा सल्ला आणि त्यांनी काय केले हे न पाहता स्वतःला काय वाटते आहे ते करा. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या डोक्याचा वापर अनोख्या दिशेने करत नाही. त्यामुळे आपल्यातील नावीन्याचे निकष हे इतरांच्या हातात आहेत, अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती असेपर्यंत नवे काहीच जन्माला येणार नाही. आपल्यातला वेगळेपणा शोधण्याचा प्रयत्न करा. त्यातच हटके काहीतरी सापडेल.
स्वतःमधील बलस्थानांचा शोध घ्या, आव्हानांना सामोरे जायला तयार रहा. त्यामुळे तुमच्यातील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती कामाला लागेल आणि जे काही हाती घेतलेले आहे त्यात हटके काही तरी घडेल. जगात प्रत्येक क्षेत्रात जे काही शोध लागलेत त्यासाठी त्या माणसांची हटके विचार करण्याची शक्तीच कारणीभूत होती. तेही इतरांसारखा विचार करत बसले असते तर, जगात आत्तापर्यंत फारच थोडे शोध लागले असते.
प्रयोगशील रहा. नवीन प्रयोग आपल्या व्यवसायात, नोकरीत करून पाहा. काही तरी नवे गवसेल. आपल्या अवती-भोवती असणारे नावीन्य निरखण्याचा प्रयत्न करा. तुम्हालासुद्धा असे हटके नक्कीच जमेल. आपली विचारांची दिशा बदलली म्हणजे झाले. आपण जुन्यालाच चिकटूनच राहिलो तर, मात्र आपल्याकडून काही अपेक्षा ठेवता येणार नाही. हो, पण काही वेळेस परत एकदा जुन्याकडे जाण्यातसुद्धा हटकेपणा असतो बरं का! कपड्यांच्या फॅशनच्या बाबतीत असेच काहीसे आहे.
प्रत्येकाला काही तरी हटके पाहिजे असते. आपल्या आयुष्यात असा वेगळेपण का आणायचा? तर, प्रत्येकाला आपल्या दैनंदिन कामात, नियमितपणात दडलेला कंटाळा दूर व्हावा, नैराश्य जावे यासाठी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.