करिअर अपडेट : खाद्यसंस्कृतीची ओळख : कलिनरी टुरिझम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Culture

भारतीय खाद्यसंस्कृती प्राचीनकाळापासून जगप्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळी राजे, महाराजे यांना खाद्यपदार्थांची आवड होती.

करिअर अपडेट : खाद्यसंस्कृतीची ओळख : कलिनरी टुरिझम

- डॉ. वंदना जोशी

भारतीय खाद्यसंस्कृती प्राचीनकाळापासून जगप्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळी राजे, महाराजे यांना खाद्यपदार्थांची आवड होती. त्यांनी या खाद्यसंस्कृतीला खूप प्रोत्साहन दिले. त्यामुळेच भारतात विविध पाककृती निर्माण झाल्या. राजस्थानी, मुघलाई, महाराष्ट्रीयन पद्धतींच्या विविध पाककलांचा आस्वाद घेणे त्यामुळे शक्य झाले. कलिनरी टुरिझम म्हणजेच फूड टुरिझम किंवा गॅस्ट्रोनॉमी टुरिझम होय. या पर्यटनामध्ये पर्यटक, पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच तेथील विशेष खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्याची माहिती व ज्ञान मिळवण्यावर विशेष भर दिला जातो

कालिनरी पर्यटनामध्ये स्थानिक खाद्यपदार्थ, पाककला त्याचा इतिहास, तेथील संस्कृती, तेथे राहणाऱ्या स्थानिकांचा कल, पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया व तंत्रे याबद्दल माहिती दिली जाते. ही माहिती त्या विभागातील परंपरा, संस्कृती व वारसा यांचे प्रतिबिंब असते. भारत हा भौगोलिकदृष्ट्या संपन्न देश असल्यामुळे वेगवेगळ्या भूप्रदेशात विविध पिके, धान्ये येतात व त्याचबरोबर भारताची मसाल्याच्या पदार्थांची परंपरा व लौकिक सर्वमान्य आहे. परिणामी अगणित अशा स्वादिष्ट खाद्यपदार्थांची पर्यटकांना पर्वणीच आपसूकच मिळते.

‘वर्ल्ड फूड ट्रॅव्हल असोसिएशन’च्यामते, सर्व पर्यटनाच्या खर्चाच्या साधारण १५ ते ३५ टक्के एवढा खर्च खाद्यपदार्थ व पेय यांचा असतो. भारतीय पर्यटनाच्या बाबतीत हा अंदाजे ४० टक्के एवढा आहे. भारतामध्ये प्रत्येक १०० किलोमीटरला स्थानिक पदार्थामध्ये वेगळेपण आढळून येते. हेच वेगळेपण खाद्य व पाककला पर्यटनाचे मुख्य कारण आहे.

महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि कोकण येथे खाद्य पदार्थ व स्थानिक पाककला जाणून घेण्यासाठी विविध सहलींचे आयोजन केले जाते. याव्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, जयपूर येथील अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये निष्णात शेफतर्फे त्या विभागातील विशेष पाककृती शिकवल्या जातात. हाही एक ‘कलिनरी टुरीझम’चा एक भाग आहे. तसेच ‘कलिनरी टुरिझम’मध्ये कुकिंग क्लासेस, टी टेस्टिंग, वाइन टेस्टिंग, बार क्लॉव्हर्स, कलिनरी ट्रेल्सचा समावेश आहे. या विशेष अशा खाद्यपदार्थ सहलींचा कालावधी चार ते सहा तास एवढा असतो. यामध्ये साधारणतः पाच ते सात विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येतो. याशिवाय नेहमीपेक्षा वेगळ्या पर्यटनस्थळांना भेटीही देता येतात. अशा या नावीन्यपूर्ण व आगामी करिअरकरीता डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम किंवा पर्यटनाचा इतर कोणताही अभ्यासक्रम करणे अधिक फायद्याचे आहे. यासाठी आपल्या विभागातील खाद्यसंस्कृती, अन्नधान्ये, पिके, त्यांचे हंगाम, मसाल्याचे पदार्थ त्याचे विशेष उपयोग तसेच ते पदार्थ तयार करण्याची पद्धती आदींची माहिती आवश्यक आहे. कारण या कलीनरी ट्रेल दरम्यान पर्यटकाला माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरते.

या विशेष खाद्य पदार्थ व पाककला सहलीसाठी आपल्या विभागातील किंवा शहरातील मुख्य खाद्य पदार्थ, त्यांचे प्रसिद्ध आउटलेट किंवा रेस्टॉरंट, त्याचा दर, तेथील स्वच्छता त्याचबरोबर त्या पदार्थांसोबत दिल्या जाणाऱ्या इतर सहपदार्थांची पूर्ण माहिती असावी. यामध्ये फूड किंवा कलिनरी ट्रेल प्लॅन करून पर्यटकांना गाइड करता येते.

आवश्यक कौशल्ये

  • उत्तम संवादकौशल्य

  • मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्त्व

  • उत्तम ग्राहकसेवा देण्याचे कौशल्य

  • इंटरपर्सनल स्किल्स

  • स्वतःला उत्तम खाद्यपदार्थांची जाण आणि आवड असणे.

Web Title: Dr Vandana Joshi Career Update Food Culture Identity Culinary Tourism

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top