करिअर अपडेट : कृषी पर्यटन : संस्कृतीला रोजगाराची जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture Tourism

भारताची जगभरात कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. भारत हा शेतीमधील विविधतेसाठी जगप्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या भागातील शेती, पिकांमधील विविधता कृषी पर्यटनाचा मूलभूत घटक आहे.

करिअर अपडेट : कृषी पर्यटन : संस्कृतीला रोजगाराची जोड

- डॉ. वंदना जोशी

भारताची जगभरात कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. भारत हा शेतीमधील विविधतेसाठी जगप्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या भागातील शेती, पिकांमधील विविधता कृषी पर्यटनाचा मूलभूत घटक आहे. आणि हीच विविधता पर्यटकांना कृषी पर्यटनासाठी प्रेरणा देते. भारतातील अंदाजे ६५ टक्के लोकसंख्या ही शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायांवर अवलंबून आहे. कृषी व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु, आजही भारतातील लोक याकडे व्यवसाय म्हणून नव्हे तर संस्कृती म्हणूनच बघतात. कृषी पर्यटनामध्ये, पर्यटकाला फार्महाउसमध्ये राहण्यासाठी, शेतीच्या कामात सहभाग घेण्याची आणि पारंपरिक खाद्यपदार्थ खाण्याची संधी मिळते. यामध्ये काही विशेष ॲक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात. मुख्यत्वे बैलगाडी, ट्रॅक्टर चालविणे, भात लागवड करणे, पक्षी निरीक्षण, पतंग उडवणे, मासेमारी इ. गोष्टींचा समावेश आहे. कृषी पर्यटन हे कृषी व पर्यटन यांच्या समन्वयातून निर्माण झाले आहे. कृषी पर्यटन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरत आहे. ज्यात पर्यटकांच्या राहण्याचा, जेवणाचा आणि इतर ॲक्टिव्हिटीजसाठी आकारलेल्या शुल्कातून उत्पन्न मिळते. या व्यतिरिक्त कृषी पर्यटनामध्ये पर्यटक त्यांच्या भेटीदरम्यान थेट शेतातील ताजी फळे, भाज्या, धन्य खरेदी करतात त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळतो. म्हणूनच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. कृषी पर्यटनाचा, शहरी लोकांना ग्रामीण जीवनाची, तेथील संस्कृतीची ओळख व अनुभव मिळवून देण्याबरोबरच ग्रामीण शेतकरी वर्गाला रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य देण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे.

शहरातील कल्लोळ, तणावपूर्ण वातावरण, प्रदूषण यापासून दूर जाण्याचा मार्ग म्हणजे कृषी पर्यटन. यातील लहान कालावधीच्या सहलींमध्ये पर्यटक आसपासच्या ग्रामीण ठिकाणांना भेटी देतात. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तेथील लोकसंस्कृती, लोकांचे जीवनमान, खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक लोककलेचा अनुभव घेतात. पर्यटकांची त्याचदरम्यान भेटलेल्या माणसांशी नकळतपणे घट्ट नाळ जोडली जाते. ॲग्री टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननुसार, शहरी लोकांना गावाकडच्या जीवनमानाचे आणि शेतीविषयक गोष्टींचे प्रचंड आकर्षण आणि उत्सुकता आहे. आणि म्हणूनच या पर्यटनाचा पाय भक्कमपणे रोवला गेलेला आहे. कृषी पर्यटन ही युरोपातील संकल्पना भारत रुजविण्याचे काम पांडुरंग तावरे यांनी केले. कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्र राज्याने कृषी पर्यटनाचे महत्त्व जाणून महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरणामध्ये कृषी पर्यटनाला विशेष सुविधा दिल्या आहेत.

महाराष्ट्रात ३० जिल्ह्यांमध्ये ३२८ कृषी पर्यटन स्थळे आहेत. आंबा महोत्सव, संत्री महोत्सव, द्राक्ष महोत्सव अशा विविध महोत्सवांद्वारे कृषी पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. पर्यटनाच्या मूलभूत माहितीसाठी डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम किंवा पर्यटनाशी संबंधित इतर कोणताही अभ्यासक्रम केल्यास फायदा होतो. यामध्ये ट्रॅव्हल एजंट म्हणून सहली, शैक्षणिक सहली, लहान व शालेय विद्यार्थ्यांसाठी सुट्टयांमधल्या सहली कृषी पर्यटन केंद्राच्या समन्वयाने काढू शकतात.

आवश्यक कौशल्ये :

  • ग्रामीण जीवनशैलीबद्दलची उत्सुकता : यामध्ये ग्रामीण जीवन, शेती, तेथील राहणीमान, लोककला, हस्तकला इ. माहितीचा समावेश आहे.

  • ज्ञान : पर्यटन परिसराचे ज्ञान, वन्यजीवन व भौगोलिक ज्ञान

  • संवाद कौशल्य.

  • निगोशिएशन स्किल.

Web Title: Dr Vandana Joshi Writes Agriculture Tourism Addition Of Employment To Culture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top