करिअर अपडेट : हवाई वाहतूक

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सादर केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीमध्ये २.४८ कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमान वाहतुकीद्वारे प्रवास केला आहे.
Air Transport
Air TransportSakal
Summary

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सादर केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीमध्ये २.४८ कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमान वाहतुकीद्वारे प्रवास केला आहे.

- डॉ. वंदना जोशी

पर्यटन म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी केलेला प्रवास. ज्यात वारसा पर्यटन, साहसी पर्यटन, आरोग्य पर्यटन आदी स्वरूपाच्या पर्यटनांमध्ये आवश्यक असा घटक म्हणजे प्रवासी वाहतूक. पर्यटनस्थळ दूर असल्यास प्रवासाचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे हवाई वाहतूक. यामध्ये पर्यटकांचा पर्यटनस्थळापर्यंत पोहोचण्याच्या वेळेबरोबरच कष्टही कमी होतात. हवाई वाहतूक हा पर्यटन व्यवसायाचा कणा आहे. हवाई वाहतूक विकास आणि पर्यटन विकास हे एकमेकांवर अवलंबून असून, परस्परांना पूरकही आहेत. सुमारे ५८ टक्के आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतातील पर्यटन प्रवासासाठी हवाई वाहतुकीचा पर्याय निवडतात. आजकाल देशांतर्गत सहलींसाठीही विमान सेवेचा समावेश टूर ऑपरेटर्सकडून पर्यटकांसाठी केला जातो.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सादर केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीमध्ये २.४८ कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमान वाहतुकीद्वारे प्रवास केला आहे. या वाढीचे प्रमाण ८६.७४ टक्के एवढे आहे. भारतातील आठ शेड्यूल एअरलाइन्स, भारतातील आणि भारताबाहेरील विविध पर्यटनस्थळांना जोडतात. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या २०१८मधील सर्व्हेनुसार, अंतर्गत विमान वाहतुकीसाठी भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लो कॉस्ट कॅरिअरचा विस्तार व देशातील बदलत्या आर्थिक वातावरण यामुळे विमान प्रवासाचा विस्तार होत आहे. त्यामुळे सामान्यांनाही विमान प्रवास करता येतो. भारत सरकारनेही विमान वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. उदा. उडान. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातील काही विभांगासाठी पर्यटनातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते.

पर्यटन क्षेत्रातील मूलभूत ज्ञान जसे की, ट्रॅव्हल जिओग्राफीसाठी डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम किंवा पर्यटनासंबंधी इतर कोणत्याही अभ्यासक्रमानंतर इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचा (आएटीए) फेअर्स अँड तिकिटिंगचा अभ्यासक्रम केल्यास अधिक फायदा होतो. आयएटीए अभ्यासक्रमध्ये जीडीएस व फेअर कॅलक्युलेशनचा समावेश असून, ते आंतरराष्ट्रीय तिकिटिंगसाठी गरजेचे आहे. यामध्ये पर्यटनक्षेत्राचे ज्ञान असलेल्यांना एअर तिकिटींग स्टाफ, एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ, पॅसेंजर रिझर्व्हेशन अँड तिकिटींग, कस्टमर सर्व्हिस एजंट, एअरलाइन कॉल सेंटरमध्ये संधी आहेत.

हवाई वाहतूक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये...

१. भूगोलाचे ज्ञान - यात ट्रॅव्हल जिओग्राफी- वेगवेगळ्या देशातील वेळ, मुख्य विमानतळे यांचा समावेश आहे.

२. तांत्रिक ज्ञान - विमान कंपन्यांचे तिकिटिंग आणि इतर सर्वकामे संगणकाद्वारे होत असल्यामुळे तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे.

३. प्रभावी संवाद कौशल्य

४. विमान कंपन्यांची आणि त्याच्या नियमांची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com