esakal | दहावीनंतर पुढे काय! कोणत्या शाखेत करिअरची संधी?
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीनंतर पुढे काय! कोणत्या शाखेत करिअरची संधी?

दहावीचे विद्यार्थी पुढच्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेची तयारी करत आहेत.

दहावीनंतर पुढे काय! कोणत्या शाखेत करिअरची संधी?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचे निकाल जाहीर केले. यानंतर आता दहावीचे विद्यार्थी पुढच्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेची तयारी करत आहेत. दहावीला किती गुण मिळाले आणि विद्यार्थ्याचा कल कशाकडे आहे यानुसार कुठे प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलं जातं. ७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड केली जाते. गुण जास्त पडले म्हणून विज्ञान शाखा घेणं घाई ठरेल. यामध्ये विद्यार्थ्याची तयारी आहे का? त्याचं आधीचं शिक्षण कोणत्या माध्यमातून झालं आहे याचा विचार व्हायला हवा.

दहावीपर्यंत विद्यार्थ्याला कुठले विषय आवडले, समजले, झेपले आणि कुठले विषय आवडले नाहीत, कोणत्या विषयात न समजता फक्त पाठांतराच्या जोरावर मार्क मिळवले याची माहिती असते. पण ही गोष्ट उघड बोलून दाखवण्याचे धाडस ते करू शकत नाहीत. अशा वेळी फक्त गुण जास्त मिळाले निर्णय घेतला जातो.

हेही वाचा: दहावी पास युवकांसाठी खुषखबर! 25271 कॉन्स्टेबल पदांची होणार भरती

दहावीनंतर शाखा निवडीचा निर्णय अनेकदा मित्रांनी घेतलं म्हणून असा पद्धतीनं घेतला जातो. हे खूपच चुकीचं आहे. दर वर्षी अनेकांना याचा फटका बसतो. बारावीत चांगले गुण मिळत नाही. एक दोन वर्षे वाया गेल्यानंतर या गोष्टी लक्षात येतात. मार्क किती मिळाले याआधारे किंवा मित्र-मैत्रिणी काय निवड करतात या आधारे दहावीनंतर शाखा निवड करणे थोडे धोक्याचे आहे.

वाणिज्य शाखा (Commerce)

वाणिज्य शाखा ही बहुपर्यायी मानली जाते. एकतर कॉमर्सची पदवी घेत असतानाच, सी.ए. बेसिक प्रोग्रॅम कोर्स करता येतात, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट, विधी शाखा, बँक परीक्षा, फायनान्स विभाग, आदी अनेक पर्याय या विभागात उपलब्ध आहेत. कॉमर्स पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए आणि संगणक विभागाकडेही वळता येते. सध्या एमबीएमध्ये एचआर, फायनान्स अन् मार्केटिंगकरिता देखील चांगली संधी निर्माण झालेली आहे.

हेही वाचा: फिजिक्समधून पदवी घेतलीये? 'या' क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी

विज्ञान शाखा (Science)

विज्ञान शाखेची निवड आजही मेडिकलसाठीच केली जाते. यातही एमबीबीएस हा महत्त्वाचा भाग असतो. बारावी सायन्सनंतर मेडिकलमधल्याच अनेक फॅकल्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. त्यापैकी डीएमएलटी, एमएलटी, एक्सरे टेक्निशियन, फार्मसी, रिसर्च आदी शाखांकडे विद्यार्थ्यांना जाता येते. याशिवाय बीएस्सी केल्यानंतर कृषी पदवीकडे वळता येतेच, शिवाय जीवशास्त्रातील आधुनिक वाटा आपल्याशा करता येतात. बारावी सायन्सनंतर विद्यार्थी विधी शाखेसह संगणक शाखेकडेही वळू शकतो. सध्या सर्व कार्यालये डिजिटल होत असल्याने संगणक पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांना नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

कला शाखा (Arts)

कला शाखेतून भारतीय संगीत, गायन, वादन, अभिनय, साहित्य, विद्या, भाषा, या पारंपरिक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम अन् आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध आहेत. १२ वीनंतर स्पेशलायझेशन करता येते. या सर्व अभ्यासक्रमांना भारतासह इतर देशांतही मागणी आहे. याशिवाय बारावीनंतर विद्यार्थी विधी शाखेकडे वळू शकतो. विधी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय नोकरीच्या अन् करिअरच्या, मास्टरकीच्या, सरकारी तसेच खासगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. बारावी कलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डीएड, बी.एड, बीपीएड आदी पर्यायही खुले आहेत. शिवाय कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.ए, एमफीएल, डॉक्टरकी आदींच्या माध्यामातून प्राध्यापकी करू शकतात. याशिवाय आर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करिअर करीत आपल्यातील हस्तकौशल्याला वाव देण्याचाही एक पर्याय या विद्यार्थ्यांसमोर असतोच. विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भात सकाळ डिजिटलतर्फे एक उपक्रम राबवला जाणार असून याबाबतची सविस्तर माहिती लवकरच सकाळच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉम्सवर मिळेल.

loading image