Education inflation : शिक्षणाचा खर्च वाढला दप्तराच्या ओझ्या इतकाच

महागाई वाढली पण शिष्यवृत्तीत वाढ नाही : शासनाचा उद्देशच होतोय असफल
Education inflation
Education inflation sakal

नांदेड : वाढत्या महागाईच्या झळा शिक्षण क्षेत्रालाही बसत आहेत. यावर्षी जीवनावश्यक वस्तूंबरोबरच शैक्षणिक वस्तूंवरही जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे दप्तराच्या ओझ्या इतकाच खर्च वाढला आहे. शाळांच्या शुल्कामध्येही भरमसाठ वाढ झाली आहे. त्या तुलनेत शासन विद्यार्थ्यांना देत असलेल्या विविध शिष्यवृत्तींची रक्कम अगदीच तुटपुंजी ठरत आहे. शिष्यवृत्तीचा उद्देश सफल होण्यासाठी या रकमेत दर्वर्षी वाढ करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

आजची बालके ही उद्याचे भावी नागरिक असल्याने देशाचे भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या बालकांचा सर्वांगीण विकास गरजेचा आहे. त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. केवळ आर्थिकतेच्या कारणास्तव विद्यार्थी शैक्षणिक हक्कापासून वंचित राहू नयेत. यासाठी राज्य शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना १४ प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येतात. त्यामध्ये विविध शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क तसेच इतर शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक पाठबळ मिळते.

मात्र, गत दोन वर्षांपासून महागाईचा आलेख उंचावू लागला आहे. त्यातच यावर्षीपासून जीवनावश्यक वस्तू व शैक्षणिक साहित्यावरही १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे शिक्षण महागले आहे. त्या तुलनेत मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम अगदीच तुटपुंजी पडू लागली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीकडे विद्यार्थी व पालकांचा कल असतो. मात्र, या शिष्यवृत्तीच्या रकमेबाबतही मोठ्या तक्रारी आहेत. यामुळे शिष्यवृत्ती देण्यामागचा केवळ आर्थिकतेच्या कारणाने शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश फोल ठरु लागला आहे.

त्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कमही महागाईच्या तुलनेत वाढवण्यात यावी, अशी मागणी शिष्यवृत्तीधारकांमधून जोर धरू लागली आहे. त्यामध्ये गत अनेक वर्षांत वाढ झालेली नाही. सध्या पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दरवर्षी एक हजार रुपये असे तीन वर्षे तीन हजार रुपये दिले जातात. तर आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रतिवधी एक हजार पाचशे रुपये प्रमाणे तीन वर्षे ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, शिष्यवृत्तीची ही रक्कम वेळेत दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक उदासीन असल्याचे चित्र आहे.

विद्यार्थ्यांची संख्या घटली

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. शिक्षणाद्वारे मुलांचे सक्षमीकरण करणे, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी गळती थांबवणे, पालकांना त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यास उत्तेजन देणे, शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा भार कमी करणे यासाठी विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात येतात. शालेय जीवनातील शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करणे, ही त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पावती मानली जाते. या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळणे हे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देणारे ठरते. मात्र, अनेक वर्षांपासून या शिष्यवृत्तीच्या रकमेत शासनाने वाढ केली नाही, त्यामुळे तुटपुंज्या शिष्यवृत्तीसाठी प्रविष्य होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे.

एनएमएमएस शिष्यवृत्तीतही वाढ नाही

एनएमएमएस या शिष्यवृत्तीमध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे इयत्ता आठवी ते बारावी या कालावधीत प्रतिवर्षी ही रक्क देण्यात येते. तर सारथी शिष्यवृत्तीमध्ये दरवर्षी नऊ हजार ५०० रुपयांप्रमाणे इयत्ता आठवीपासून बारावीपर्यंत शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते. महागाईच्या तुलनेत या रकमेत गत अनेक वर्षांपासून वाढ झालेली नसल्याने लाभार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com