MPSC : एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education news student MPSC Exam Time Table Announced

MPSC : एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी (ता. २८) जाहीर झाले. एमपीएससीने २०२३ च्या परीक्षांचे तब्बल तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना २०२३ पासून परीक्षांच्या स्वरूपात झालेल्या बदलानुसार परीक्षेचे नियोजन करण्यास वेळ मिळणार आहे. एमपीएससीच्या राज्य सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा २०२३ पासून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाऐवजी वर्णनात्मक स्वरूपात होणार आहे.

तसेच या परीक्षेच्या नावात बदल करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित या नावाने आता २०२३ मध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून राज्य सेवेच्या ३३ संवर्गासह वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा या सेवांसाठी एकत्रित पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा ४ जून २०२३ रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षेची तारीख कळविली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा २०२३ ही परीक्षेची पूर्व परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार आहे. या अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, उद्योग निरीक्षक,आदी पदांचा समावेश आहे. तसेच दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांच्या २०२३जाहिराती प्रसिद्ध होण्याचा संभाव्य महिना, पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अंदाजित तारखा वेळापत्रकात आहेत.