
Mumbai News : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आरटीई प्रवेशाची लॉटरी
मुंबई : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या २५ टक्के आरटीई प्रवेशाची लॉटरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. राज्यभरातून करण्यात आलेल्या सर्व अर्जांची छाननी एनआयसी माध्यमातून केली जात आहे.
ती लवकरच पूर्ण होणार असल्याने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर केली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. राज्यातील ८हजार ८२८ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी ३ लाख ६३ हजार ३९ अर्ज आले आहेत. त्यासाठी २५ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
उपलब्ध जागांपेक्षा तिपटीने अधिक अर्ज आल्याने या प्रवेशाची लॉटरी काढण्यापूर्वी अनेक जणांची अर्ज ही अर्धवट, दुबार आणि अनेकदा चुकीची माहिती भरलेली असतात. ती तपासली जाणार आहेत. त्यामधे सुमारे १० टक्के अर्ज बाद होण्याची शक्यता असते.
लॉटरी ही शाळानिहाय आलेले अर्ज, तसेच त्यांची संख्या लक्षात घेऊन काढली जाणार आहे. त्यात सुरुवातीला दिव्यांग, आणि एक किमी परिसरातील आणि त्यानंतर १ ते ३ किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांची लॉटरी काढली जाते. लॉटरी काढल्यानंतर तितकेच विद्यार्थी हे प्रतीक्षा यादीत असतात. त्यामुळे नंतरच्या काळात त्याचाही विचार केला जातो, अशी माहिती यावेळी संचालकांनी दिली.
मुंबईत मोठी चुरस
मुंबई आरटीई प्रवेशासाठी २७२ शाळा असून त्यामध्ये ६ हजार ५६९ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी १८ हजार २६२ अर्ज आले आहेत. यामध्ये मध्य मुंबईतील काही ठराविक शाळांसाठी सर्वाधिक अर्ज आल्याने येथे प्रवेशासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे.