इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ‘एनसीएल’ सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education Three months deadline for submission of NCL 11th admission

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ‘एनसीएल’ सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलेअर-एनसीएल) काही तांत्रिक बाबींमुळे विद्यार्थी सादर करू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना एनसीएल प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात यावी, असे शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अद्याप एनसीएल प्रमाणपत्र मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांचा इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रवेशासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (एनसीएल) (non creamy layer) उपलब्ध असल्यास विद्यार्थी हे प्रमाणपत्रे अपलोड करू शकतील. परंतु, हे प्रमाणपत्र अर्ज भरतेवेळी अपलोड करणे बंधनकारक करण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन त्यांना संबंधित प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा, असे सपकाळ यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला, परंतु मंडळाकडून गुणपत्रके प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे ?

- निकाल विलंबाने जाहीर झाला, अशा विद्यार्थ्यांना त्या-त्या वेळी प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ऑनलाइन अर्ज भरून केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. मूळ गुणपत्रक मिळण्यास विलंब होणार असल्यास संबंधित परीक्षा मंडळाकडून ऑनलाइन प्राप्त झालेली गुणपत्रके ग्राह्य समजण्यात येतील. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांनी गुणांचा तपशील ‘डिजीलॉकर’वर उपलब्ध असल्यास त्याची प्रत घेऊन अपलोड करावी. मंडळाच्या पोर्टलवरून मिळणारी प्रत आपल्या माध्यमिक शाळेकडून प्रमाणित करून घ्यावी आणि ती अपलोड करावी.

एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कशी असेल ?

- दहावीमध्ये एटीकेटीची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेरीनंतर स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेऱ्यांनंतर अर्जाचा भाग एक भरणे तसेच विकल्प (अर्जाचा भाग दोन) भरण्याची सुविधा देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना कोणत्या कारणांमुळे अर्जाचा भाग दोन भरता येत नाही?

- विद्यार्थ्यांने भरलेल्या प्रवेश अर्जातील माहितीची पडताळणी ही अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे केली जाते. अर्जाची पडताळणी होण्यासाठी विलंब होणे, तसेच व्हेरीफिकेशन अचूक न होणे याबाबी निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन वेळेत भरता येत नाही. त्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो. हे टाळणे आवश्यक आहे. याबाबत संबंधितांनी अर्ज व्हेरीफिकेशनची कार्यवाही अचूक व वेळेत पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी.

आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी कोणती कागदपत्रे सादर करावीत?

- सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांचा स्वत:चा जातीचा दाखला अद्याप मिळाला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला ग्राह्य धरता येईल. ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. व्हीजे-एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यासोबत उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे ‘नॉन- क्रिमीलेअर’ प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने एनसीएल प्रमाणपत्र मिळणारच नसेल अशा विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरणे योग्य आहे.

Web Title: Education Three Months Deadline For Submission Of Ncl 11th Admission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top