दैनंदिन गुणवत्ता फेरीद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीच्या प्रवेशाची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Admission

राज्यात इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सध्या १२ हजार ६८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसल्याचे दिसून येते.

दैनंदिन गुणवत्ता फेरीद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीच्या प्रवेशाची संधी

पुणे - राज्यात इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सध्या १२ हजार ६८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसल्याचे दिसून येते. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे ‘सतत विशेष फेरी’ (दैनंदिन गुणवत्ता फेरी) मंगळवारपासून (ता. २७) सुरू करण्यात येत आहे. दररोज पसंती, दररोज सुधारित गुणवत्ता यादी हे या फेरीचे वैशिष्ट्य आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर क्षेत्रांतील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि तीन विशेष फेऱ्या झाल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत (ता.३०) या फेरीचे आयोजन केले आहे. दैनंदिन गुणवत्ता फेरी ही नावाप्रमाणे दररोज नवीन असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात दिलेल्या वेळेत दररोज अर्ज करणे आवश्यक असणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मिळेल. त्या दिवसात प्रवेश न घेतल्यास त्या दिवसासाठी दिलेली पसंती रद्द समजली जाईल व पुढील दिवसासाठी त्यांना पुन्हा ऑनलाइन अर्ज करता येईल. ही फेरी दैनंदिन गुणवत्तेवर आधारित असणार आहे. निवडलेल्या आणि प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी १० वाजता घोषित होईल. यासाठी विद्यार्थ्यांना दररोज नव्याने अर्ज करावा लागणार आहे. यात विद्यार्थ्यांची प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाच्या यादीतील स्थिती त्यांना दाखविली जाणार आहे.

यापूर्वी घेतलेल्या प्रवेश फेऱ्यांमध्ये ॲलॉटमेंट देत असताना विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार केवळ एकच विद्यालय ॲलॉट केले जात होते. त्यामुळे प्रत्येक फेरीमध्ये काही विद्यार्थ्यांना त्यांचे गुणवत्तेनुसार ॲलॉटमेंट मिळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी आणि त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविलेल्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी त्यांचे प्रतीक्षा यादीतील स्थान समजावे, यासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरीचे आयोजन केल्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले. या फेरीची सविस्तर माहिती ‘https://11thadmission.org.in/’ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

- प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय मिळू न शकलेले विद्यार्थी : ११,४६२

- प्रवेश न घेतलेले विद्यार्थी : १,२२२

- एकूण प्रवेश न मिळालेले विद्यार्थी : १२,६८४