शिकणाऱ्या प्रत्येकासाठी...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा महिना. थंडीचा महिना म्हणजे छानशा पांघरुणात गुरफटून पहाटेची छान छान स्वप्ने पाहण्याचा महिना. वर्षाचा अखेरचा महिना. निम्मे शैक्षणिक वर्ष संपून सत्र परीक्षेचा निकाल हातात देणारा महिना. माझ्या दृष्टीने या लेखमालेचा शेवटचा महिना. मग या महिन्यातील लेखांची शृंखला कशी गुंफावी याचा विचार करताना एक ठळक मुद्दा समोर आला. करिअरबद्दल सारे काही साऱ्या जणांना सांगितले, तरी एक प्रश्‍न पुन्हा विचारला तरी जातोच की? आमचा मुलगा/मुलगी काहीही विचारले तरी बोलतच नाही ना?

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
डिसेंबर महिना म्हणजे थंडीचा महिना. थंडीचा महिना म्हणजे छानशा पांघरुणात गुरफटून पहाटेची छान छान स्वप्ने पाहण्याचा महिना. वर्षाचा अखेरचा महिना. निम्मे शैक्षणिक वर्ष संपून सत्र परीक्षेचा निकाल हातात देणारा महिना. माझ्या दृष्टीने या लेखमालेचा शेवटचा महिना. मग या महिन्यातील लेखांची शृंखला कशी गुंफावी याचा विचार करताना एक ठळक मुद्दा समोर आला. करिअरबद्दल सारे काही साऱ्या जणांना सांगितले, तरी एक प्रश्‍न पुन्हा विचारला तरी जातोच की? आमचा मुलगा/मुलगी काहीही विचारले तरी बोलतच नाही ना? त्याला काही ठरवताच येत नाही ना? तो काही सांगतच नाही ना? किंवा याउलटसुद्धा परिस्थिती असू शकते. आम्हा दोघांना त्याने/तिने काय शिकावे/करावे वाटते ते त्याला/तिला पटतच नाही. आम्ही काय शत्रू आहोत काय? त्यांचे भले कशात ते आम्हाला कळत नाही काय? या दोन प्रकारांत मोडणारे जवळजवळ ९० टक्के विद्यार्थी व पालक सहज सर्वत्र सापडतात. उरलेल्या दहा टक्‍क्‍यांमध्ये विभागणी होते ती नऊ टक्के व एक टक्क्यांमध्ये. नऊ टक्के पालकांच्या समोर छान छान मार्कांचा गुच्छ दिसत असतो किंवा ते मार्क हाती आलेले असतात.

म्हणजेच इयत्ता दहावीत अचानकपणे मुलांनी ८० ते ९० टक्के मिळवलेले असतात. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अमिताभ बच्चन प्रत्येक स्पर्धकाला विचारतात ना, ‘येथे जिंकलेल्या रकमेचे काय करणार?’ अगदी तसाच प्रश्‍न या पालक व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. अशा वेळी दिलेली उत्तरे पोकळ असतात कारण त्यामागे नेमका विचार, आधार, दिशा व वाटचालीचा आराखडा कधीच नसतो. 

तुम्हीच आठवून पाहा ना, करोडपती झालेल्या एखाद्याची यशोगाथा ऐकलीयत? रिऍलिटी शोमधील आयडॉल्सनी यशाचे शिखर लगेच गाठले आहे का? राहता राहिला एक टक्‍क्‍याचा प्रश्‍न. सारेसारे मिळणे शक्‍य आहे. पण, काय करावे तेच समजत नाही अशांचा. विविध शास्त्रीय चाचण्या करूनही उत्तरे न सापडणारे या गटात मोडतात. वर उल्लेख केलेल्या प्रत्येकासाठी या शेवटच्या महिन्यातील माझे शब्दांकन करावे, असे मी ठरवले आहे. निव्वळ नववी, दहावीच्या पालकांसाठी नसून शिकणाऱ्या प्रत्येक घरासाठी ते असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For everyone who learns