.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
प्रेरणा
मित्र-मैत्रिणींनो, महाराष्ट्रातील निवडक सागरी किल्ल्यांच्या इतिहासाची आणि त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठ्यांच्या आरमाराची ओळख करून देणाऱ्या घनश्याम ढाणे लिखित ‘सागरावरील स्वराज्य’ या पुस्तकाची आज आपण ओळख करून घेऊया. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर किल्ले बांधून हिंदवी स्वराज्य बळकट केले त्याचप्रमाणे आरमाराची निर्मिती करून देशाच्या सागरी सीमांवरून होणाऱ्या परकीय आक्रमकांना जरब बसवण्याचे अत्यंत दूरदर्शी कार्यही केले आहे. त्यांच्या याच कार्याची ओळख लेखकाने प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली आहे. समकालीन अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे, ब्रिटिश, पोर्तुगीजांचे पत्रव्यवहार आणि विविध ऐतिहासिक ग्रंथांतील नोंदी या साऱ्यांचा धांडोळा घेऊन लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सागरावरील स्वराज्याच्या कार्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या काही अज्ञात पैलूंवरही प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक वाचत असताना मराठ्यांचे आरमार किती प्रगत होते याची जाणीव होऊन आपला उर अभिमानाने भरून येतो.