
Pune News : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२’ परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
पुणे : शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेसाठी (टेट) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना येत्या रविवारपर्यंत (ता.१२) अर्ज करता येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२’ परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली आहे. त्यासाठी सध्या ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पत्रानुसार उमेदवार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) प्रविष्ट झाले आहेत, परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही.
अशा उमेदवारांचा सीटीईटी परीक्षेचा निकाल ‘टेट-२०२२’ परीक्षेस अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर म्हणजे ८ फेब्रुवारीनंतर लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन या उमेदवारांना टेट-२०२२ परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या उमेदवारांच्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल येईल, तो विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असेही परिषदेने स्पष्ट केले आहे. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे मिळण्यास काही कालावधी लागणार आहे. हे लक्षात घेऊन, उमेदवारांना अशी कागदपत्रे प्राप्त करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात येत आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचा तपशील
तपशील : सुधारित कालावधी
- ऑनलाइन अर्ज सादर करणे : १२ फेब्रुवारीपर्यंत
- ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : १२ फेब्रुवारीपर्यंत
- प्रवेशपत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी : संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध होईल.