
डी.एल.एड अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी २९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने डी.एल.एड. प्रथम वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. परंतु शाळांमध्ये शिक्षक पदावर नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत केवळ आठ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अपेक्षेपेक्षा नोंदणी कमी झाल्याने परिषदेने आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २९ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. (Pune News)
इयत्ता बारावीच्या निकाल लागल्यानंतर नऊ ऑगस्टपासून डी.एल.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत यापूर्वी दिली होती. परंतु यंदा या मुदतीत दरवर्षीच्या तुलनेत कमी अर्जांची नोंद झाली. तसेच काही अध्यापक विद्यालयांचे प्राचार्य आणि अध्यापक विद्यालय संघटनांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे. यानंतर कोणत्याही प्रकारे मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे परिषदेने सांगितले आहे.
हेही वाचा: सरकारने कितीही रोखले तरी दहीहंडी उत्सव साजरा करणार - राम कदम
डायट स्तरावरून अर्जाची पडताळणी करण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी दोन सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावरील आक्षेपांचे निरसन करून पहिल्या फेरीतील प्रवेशाची यादी चार सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल. पहिल्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित अध्यापक विद्यालयात आठ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या मुदतीत ५८१ अध्यापक महाविद्यालयांनी एकूण ३१ हजार ८०९ प्रवेश क्षमतांची नोंदणी केली आहे. मुदत संपल्यानंतर २० महाविद्यालयांनी प्रवेशाची तयारी दर्शविली. या विद्यालयालयांकडून दंड आकारून त्यांची नोंदणी करून घेण्यात आली असल्याची माहिती राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव रमाकांत काठमोरे यांनी दिली.
हेही वाचा: Dahi handi 2021: सलग दुसऱ्यावर्षी दहीहंडी उत्सवाला परवानगी नाही
डी. एल.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची आकडेवारी :
तपशील : शैक्षणिक वर्ष २०२१-२२
विद्यालयांची संख्या : ६००
नोंदणी केलेले विद्यार्थी : ८,५५३
ॲप्रुव्ह झालेले अर्ज : ३,७१५
सबमिट झालेले अर्ज : १,५९८
हेही वाचा: Afghanistan Crisis : संघर्षांच्या चक्रव्यूहात अफगाणिस्तान
डि. एल. एड प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक :
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे : २९ ऑगस्टपर्यंत
डायट स्तरावर पूर्ण भरलेल्या अर्जाची पडताळणी करणे : ३० ऑगस्टपर्यंत
तात्पुरती गुणवत्ता यादी : २ सप्टेंबर
पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : ४ सप्टेंबर
पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत : ८ सप्टेंबरपर्यंत
Web Title: Extension Till 29th August For Filling Admission Form For Dled Course
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..