CA Result : सीए अंतिम परीक्षेत दिल्लीतील हर्ष चौधरी देशात पहिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICAI Harsh Choudhary from Delhi stands first in country CA final exam

CA Result : सीए अंतिम परीक्षेत दिल्लीतील हर्ष चौधरी देशात पहिला

पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स (आयसीएआय) यांच्या वतीने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम आणि इंटरमिजिएट निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. नोव्हेंबर २०२२मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेत नवी दिल्ली येथील हर्ष चौधरी हा देशात पहिला आला आहे.

तर इंदौर येथील शिखा जैन आणि मंगळूर येथील राम्यश्री या दोघींनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. नवी दिल्लीतील मानसी आगरवाल हिने तिसऱ्या क्रमांक मिळविला आहे. आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सीए इंटरमिजिएट परीक्षेत देशात दिक्षा गोयल (कर्नाळ) ही प्रथम आली असून मुंबईतील तुलिका श्रावण आणि जयपूरमधील सक्षम जैन यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक पटकाविला आहे. संस्थेतर्फे घेतलेल्या सीए अंतिम परीक्षेसाठी देशातून ६५ हजार २१० विद्यार्थ्यांनी गट एकची परीक्षा दिली, तर ६४ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी गट दोनची परीक्षा दिली.

तर जवळपास २९ हजार २४२ विद्यार्थ्यांनी दोन्ही गटांची परीक्षा दिली. सीए अंतिम परीक्षा देशातील ५०३ केंद्रांवर, तर इंटरमिजिएट परीक्षा ५५२ केंद्रांवर घेण्यात आली.

सीए अंतिम परीक्षेच्या निकालाचा तपशील

गट : परीक्षा दिलेल्यांची संख्या : उत्तीर्ण झालेल्यांची संख्या : उत्तीर्णतेची टक्केवारी

गट एक : ६५,२९१ : १३,९६९ : २१.३९ टक्के

गट दोन: ६४,७७५ : १२,०५३ : १८.६१ टक्के

दोन्ही गट : २९,२४२ : ३,२४३ : ११.०९ टक्के

सीए इंटरमिजिएट परीक्षेच्या निकालाचा तपशील

गट : परीक्षा दिलेल्यांची संख्या : उत्तीर्ण झालेल्यांची संख्या : उत्तीर्णतेची टक्केवारी

गट एक : १,००,२६५ : २१,२४४ : २१.१९ टक्के

गट दोन : ७९,२९२ : १९,३८० : २४.४४ टक्के

दोन्ही गट : ३७,४२८ : ४,७५९ : १२.७२ टक्के

आयसीएआयतर्फे २०२३मध्ये होणाऱ्या परीक्षा जाहीर आयसीएआयतर्फे २०२३ या वर्षातील सीए अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार आहे. तर सीए फाउंडेशन परीक्षा जूनमध्ये होणार आहे.

परीक्षेचे नाव : कालावधी

- फाउंडेशन कोर्स परीक्षा : २४, २६,२८ आणि ३० जून

- इंटरमिजिएट परीक्षा : गट एक- ३, ६, ८ आणि १० मे आणि गट दोन- १२, १४, १६ आणि १८ मे

- अंतिम परीक्षा : गट एक- २, ४, ७ आणि ९ मे आणि गट दोन परीक्षा - ११, १३, १५ आणि १७ मे