
IGNOU Admission : इग्नूच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात
पुणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) जानेवारी सत्राच्या प्रवेश प्रक्रियांना सुरवात झाली आहे. अभ्यासक्रमांना नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे.
मुक्त विद्यापीठाच्या वतीने यंदा १० नवे अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. इग्नूच्या पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय संचालक डॉ. डी. आर. शर्मा सांगतात, ‘‘पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
विशेष म्हणजे अनुसूचित जाती, जनजातीच्या विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम आणि बीएससीच्या अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज करावा.’’ पुणे विभागा अंतर्गत ३९ अभ्यासकेंद्र कार्यरत असून, पुण्यातील विभागीय कार्यालयही त्या पैकी एक आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकही या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. इग्नूच्या वतीने काही कौशल्याभिमूख आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली असून, आपल्या जवळच्या महाविद्यालयातील इग्नू अभ्यासकेंद्रात या संबंधीची अधिक माहिती मिळू शकते, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.
प्रवेशासाठी -
-अंतिम मुदत ः ३१ जानेवारी २०२३
- संकेतस्थळ ः https://ignouadmission.samarth.edu.in/
- किमान शैक्षणिक पात्रता ः दहावी किंवा बारावी उत्तीर्ण