- प्रा. विजय नवले
इंग्लिश ही जगाची भाषा मानली जाते. जगभरातील सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक इंग्लिश भाषा बोलतात. भारतातदेखील इंग्लिश भाषेबद्दल प्रचंड आकर्षण आहे. भारतातून ब्रिटिश सत्तेच्या अस्तानंतरदेखील भाषेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. उलट विकासाच्या मार्गावर राहायचे असेल, जगाच्या मागे पडायचे नसेल, विज्ञान-तंत्रज्ञान समजावून घ्यायचे असेल, तर इंग्रजी आली पाहिजे, असा विचार सातत्याने वाढीस लागला.
याच इंग्रजी भाषेचा भाषा म्हणून अभ्यास करायचा असेल, तर मात्र पारंपरिक शिक्षणाचा आधार घ्यावा लागेल. या भाषेच्या विविध कंगोऱ्यांचा आनंद घेण्याचे पदवी शिक्षण आहे- बीए इंग्लिश.
बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवी कोर्स आहे. बारावी कला (तसेच सायन्स, कॉमर्सदेखील) उत्तीर्ण विद्यार्थी बीएच्या प्रथम वर्षास प्रवेश घेऊ शकतात. बारावीतील गुणांच्या मेरिटनुसार प्रवेश मिळतो. सध्या तरी प्रत्येक महाविद्यालय स्वतंत्रपणे प्रवेश प्रक्रिया राबविते. अनिवार्य स्वरूपाची प्रवेशपरीक्षा नाही.
कथासंग्रह, गोष्टी, ललित साहित्य, कादंबरी, प्रवासवर्णने, नाटके, भाषेचा इतिहास, व्यक्तिचरित्रे, समकालीन वाङ्मय आदी विषयांचा अंतर्भाव अभ्यासक्रमात केलेला असतो. गद्य आणि पद्य स्वरूपातील लेखन अभ्यासण्यासाठी असते. भाषेचा अभ्यास, विविध प्रकार, भाषेचा विकास, आंतरखंडीय भाषांचे वेगळेपण समजावून घेता येते.
ऐतिहासिक काळापासून जगभर प्रसिद्ध असणारे नामांकित लेखक, कवी, अभ्यासक यांची महत्त्वाची पुस्तके हा अभ्यासाचा भाग असतो. इंडियन क्लासिक लिटरेचर, इंडियन रायटिंग इन इंग्लिश, ब्रिटिश लिटरेचर, अमेरिकन लिटरेचर हे वेगवेगळे साहित्य खुबीने शिकता येते. दर्जेदार साहित्यिक शिक्षकांची थेअरी लेक्चर्स ही या कोर्समधील रसिक विद्यार्थ्यांसाठीची मेजवानी असते. सेमिस्टर संपताना विद्यापीठ स्तरावर परीक्षा घेतल्या जातात. वैयक्तिक स्तरावर अमर्याद वाचन हा विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेचा भाग आहे.
बीए इंग्लिशनंतर एम.ए. इंग्लिशचे शिक्षण घेता येते. त्यानंतर पीएचडी हे सर्वोच्च शिक्षण शक्य आहे. शिक्षक होण्यासाठीचे डीएड/बीएड/सेट/नेट होण्यासाठी बीए इंग्लिश करावे लागते. बी.ए.नंतर एम.बी.ए.ला प्रवेश घेता येतो. लायब्ररी शिक्षणासंदर्भात बी.लिब हे शिक्षण घेणे शक्य असते. चित्रपट/नाट्य/कला क्षेत्रातील उच्च शिक्षण बी.ए.नंतर घेता येते. वकिलीचे शिक्षण घेणेही शक्य असते.
साहित्यिक होता येणे, इंग्लिश विषयातील अनुवाद करता येणे, भाषेचा अन्वयार्थ लावणे ही तर अपेक्षित करिअर आहेत. तरीही शैक्षणिक क्षेत्रात पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेच्या सहजतेमुळे शिक्षक म्हणून काम करता येते. ज्युनियर, सिनियर महाविद्यालये, विद्यापीठे यांमध्ये प्राध्यापक, प्रशिक्षक अशा अध्यापनाच्या संधी आहेत. प्रकाशन क्षेत्रात लेखक, प्रूफरीडर, भाषांतर तज्ज्ञ, टायपिस्ट आदींना संधी आहेत.
वर्तमानपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखक, पत्रकार, संपादक आदींना संधी आहेत. सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, टेक्निकल रायटिंग, कन्टेन्ट रायटिंग ही कलात्मकतेने भाषा वापराची करिअर संधी आहे. हॉस्पिटॅलिटी, इव्हेंट मॅनेजमेंट, सेल्स, मार्केटिंगसह अनेक कार्यक्षेत्रे आहेत. संशोधन, जाहिरात, कॉपीरायटर, फिचर रायटिंग इथेदेखील इंग्लिशचा उत्तम वापर करता येतो. वक्ते, सूत्रसंचालक, प्रेरणादायी व्याख्याते हे भाषेच्या माध्यमातून समाजमनावर सन्मानाचे स्थान मिळवताना दिसतात.
उत्तम इंग्लिश येणे हा यशाचा पासवर्ड मानला जात आहे. त्यामुळे इंग्लिश भाषा विषयातील पक्का अभ्यास पोषकच ठरेल. केवळ स्पोकन इंग्लिश या छोट्या उद्देशाने या पदवीकडे न पाहता इंग्लिश भाषेतील तज्ज्ञ बनणे, भाषेचे रसग्रहण करणे, साहित्य, अनुवादापासून भाषेचा व्यावहारिक वापर करता येणे असा व्यापक मुद्दा असेल तर या पदवीधरांना मोठ्या संधी राहतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.