आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस; देशातील साक्षरतेची अवस्था काय?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

भारतातील साक्षरतेचे सरासरी प्रमाण हे ७७.७ % असून आपल्या देशात केरळ हे राज्य सर्वात अधिक साक्षर आहे. 

पुणे - युनायटेड नेशन्सनी 2030 पर्यंत ठरवलेल्या धोरणानुसार 'साक्षरता' हा घटक जगाच्या शाश्वत विकासासाठी महत्वाचा मानला गेलाय. शाश्वत विकासासाठी ठरवलेल्या धोरणामधील चौथ्या मुद्द्यानुसार प्रत्येक तरुण व्यक्ती ही साक्षर आणि अंकज्ञानी झाली पाहिजे. जगाची गरिबी दूर करण्यासाठी साक्षरता ही बाब मोठ्या प्रमाणावर मदत करते असही हा मुद्दा सांगतो. आपल्या देशात साक्षरतेची काय अवस्था आहे, पाहुयात...

भारतातील साक्षरतेचे सरासरी प्रमाण हे ७७.७ % असून आपल्या देशात केरळ हे राज्य सर्वात अधिक साक्षर आहे. केरळच्या  साक्षरतेचे प्रमाण हे 93.91% आहे. दक्षिणेकडील अनेक राज्यांचा विचार केला तर ही राज्ये एकूण सरासरीच्याही मागे आहेत. तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील साक्षरतेची अवस्था ही बिकट आहे. 

एकूण राज्यांच्या यादीत महाराष्ट्र हा सहाव्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात १२.३ टक्क्यांची तफावत आहे. पुरुष ९०.४ टक्के तर महिला या ७८.४ टक्के साक्षर आहेत. 

साक्षरतेबाबत देशात पहिली पाच राज्ये
१. केरळ 
२. दिल्ली
३. उत्तराखंड
४. हिमाचल प्रदेश
५. आसाम

साक्षरतेत सर्वात मागे असलेली राज्ये
१. आंध्र प्रदेश 
२. राजस्थान
३. बिहार
४. तेलंगण
५. उत्तर प्रदेश

तेलंगणा राज्यात साक्षरतेचे प्रमाण हे 72. 8 टक्के आहे.  तर आंध्र प्रदेशात हे प्रमाण ६६.४ टक्के आहे. कर्नाटकात साक्षरतेचे प्रमाण ७७.२ आहे. आसामचा विचार करायचा झाल्यास आसाममध्ये साक्षरतेचे प्रमाण हे ८५.९ टक्के आहे. उत्तराखंड ८७.६ टक्क्यांसह देशात तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली हे राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आहे. 

हे वाचा - देशाच्या शिक्षण धोरणात सरकारचा प्रभाव कमीत कमी असावा - पंतप्रधान

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भात रिपोर्ट जाहीर केला असून या रिपोर्टमधील माहीतीनुसार केरळने आपले प्रथम स्थान अबाधित राखले आहे. इतकेच नव्हे तर केरळमधील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाणही चांगले आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेमध्ये अवघे 2.2 टक्के अंतर आहे. संपुर्ण देशाचा विचार करायचा झाल्यास भारतात पुरुषांमधील साक्षरता ही महिलांपेक्षा अधिक आहे. पुरुष ८४.७ टक्के तर ७०.३ टक्के महिला साक्षर आहेत. यामध्ये १४.४ टक्के इतके अंतर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INTERNATIONAL LITERACY DAY CONDITION OF NATION ABOUT LITERACY