
JEST and Cet Exam : ‘जेस्ट’ आणि ‘सेट’ एकाच दिवशी; विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या
पुणे - जॉईन्ट एन्ट्रान्स स्क्रिनींग टेस्टच्या (जेस्ट) बदलल्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २६ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याबरोबरच राजस्थान आणि बंगालच्या विद्यार्थ्यांची राज्य पात्रता परीक्षा (सेट) आधिच घोषीत असून, त्याच दिवशी जेस्ट परीक्षेची तारीख घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
पदव्यूत्तर आणि पीएच.डी.च्या प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावर जेस्टची परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेला बसलेले बहुतेक विद्यार्थी सेट आणि नेटचीही तयारी करत असतात. महाराष्ट्रासह इतरही राज्यांनी सेट परीक्षेची घोषणा आधीच केली आहे. मात्र नेमकी याच दिवशी जेस्टचे वेळापत्रक घोषित करण्यात आले.
पुण्यात शिकणारा विद्यार्थी खुर्षीद सांगतो, ‘२६ मार्चला माझी पुण्यात सेटची परीक्षा आहे. त्याच दिवशी बंगालमध्ये मला जेस्ट परीक्षा द्यावी लागणार आहे. संबंधीत वेळापत्रक लवकरात लवकर बदलायला हवे.’ प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी आणि संशोधनासाठी सेट परीक्षा गृहीत धरली जाते. त्यामुळे दोनही परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून, एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने विद्यार्थ्यी हवालदिल झाले आहे.