समतोल

जीवनकार्य निश्चित करण्यापूर्वी आपल्याला कशा प्रकारे जीवन जगायचे आहे? याचा बारकाईने विचार करायला हवा.
balance
balancesakal

जीवनकार्य निश्चित करण्यापूर्वी आपल्याला कशा प्रकारे जीवन जगायचे आहे? याचा बारकाईने विचार करायला हवा. किती काळ काम करायला आवडेल? हा त्यातील पहिला निकष. काही प्रकारची कामे दिवसभरात सात-आठ तास करावी लागतात, तर काही दिवस-रात्र करावी लागतात. त्यात उसंत नसतेच. सर्वसाधारणपणे कार्यालयातील कारकून, बॅंकेतील कर्मचारी, शाळेतील शिक्षक यांना दिवसातले ठराविक तास काम करून निश्चित वेळी घरी जाता येते, तर डॉक्टर, वकील, राजकारणी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना दिवसातले चोवीस तास सतर्क राहावे लागते.

काम आणि सुट्टी

उत्पादक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना अथवा सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी, परिचारिकांना, ठराविक वेळेचं काम करावं लागलं, तरी वेळा निश्चित नसतात. कधी रात्रपाळी येते, तर कधी दिवसपाळी. सप्ताहाचा विचार केला, तर काहींना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळते, तर काहींना एक दिवस. काहींना त्यांनी घेतली तरच सुट्टी मिळते.

सर्वसाधारणपणे संगणक अथवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी असते तर बाकी सर्वच क्षेत्रांत आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी असते. डॉक्टर, वकील, दुकानदार आणि व्यावसायिक, वृत्तपत्रांचे वार्ताहर यांनी मात्र घेतली तरच सुट्टी, अशी परिस्थिती असते. वर्षभराचा विचार केला, तर काही क्षेत्रांत उन्हाळी अथवा अन्य हंगामी सुट्टी असते, तर काही क्षेत्रांत आवश्यकता वाटली, तरच सुट्टी घेता येते.

शिक्षक, न्यायाधीश यांना हंगामी सुट्ट्या असतात, तर बाकी सर्व क्षेत्रांत आपल्याला गरज पडली, तर काही दिवस रजा घेता येते. काही कामे हंगामीच असतात. यात शेती व त्यावर आधारित उत्पादनांचे कारखाने, पर्यटन या क्षेत्रांचा समावेश होतो. तुम्हाला कशा प्रकारे किती वेळ काम करायला आवडेल? याचा विचार करा आणि लक्षात ठेवा की, कष्टाचा मोबदलाही तसाच मिळतो बरं का!

तुमची आवड काय?

जीवनकार्य निवडण्याचा दुसरा निकष म्हणजे, तुम्हाला कशा प्रकारचे काम आवडते? याचा विचार करा. एका खुर्चीत बसून काम करत राहायचं, की सतत हिंडत राहायचं? की मिश्र स्वरूपाचं काम करायचं? याचा विचार करा. प्रयोगशाळांमधील कर्मचारी, संशोधन, बँकेतील कर्मचारी यांना दिवसभर एकाच ठिकाणी खुर्चीत बसून काम करावे लागते, तर मार्केटिंग एजंट्‍स, खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक अथवा अधिकारी, दुरिस्ट गाइड्स यांना पायाला भिंगरी लावून काम करावे लागते.

आर्किटेक्ट्स, बांधकाम व्यावसायिक यांना काही काळ कार्यालयात, तर काही काळ बांधकामाच्या जागेवर जाऊन काम करावे लागते. तुम्हाला काय आवडणार आहे? तुम्हाला किती पैसे मिळवायचे आहेत? आपले आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे जगायचे असेल, तर आयुष्यात पैसा मिळवणं आवश्यक आहे. हातात पैसा असल्याशिवाय चांगलं शिक्षण, संसार करणं, सहली-प्रवास करणे, मनोरंजनाची साधने वापरणं असे किमान दर्जाचे आयुष्य जगणे शक्य होत नाही. त्यामुळे आपले जीवनकार्य हे अर्थार्जनाचे साधन असलेच पाहिजे.

नक्की काय हवे?

वरील सर्वच गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. एक वाढवायला गेलो, की दुसरी कमी जास्त होते. जसे एका मर्यादेनंतर मात्र जितक्या जास्त प्रमाणात पैसे मिळायचे आहेत, तेवढ्या जास्त प्रमाणात जगण्याचे स्वातंत्र्यही कमी होते. कारण आपला बहुतेक वेळ अर्थार्जनासाठीच वापरला जाऊन काही वेगळे करण्यासाठीचा वेळ व उत्साहच राहत नाही. मग मिळवलेल्या पैशाचे काय करायचे? असा प्रश्न पडू शकतो.

सुट्ट्या जास्त हव्या असलेल्या कार्यक्षेत्रात काम करायचे असेल, तर वेतन कमी होते. फिरती असलेली नोकरी घेतली, तर आपल्या आयुष्यावरील आपले नियंत्रण कमी होते. फिरती नसलेली नोकरी घेतली, तर एकाच जागी बसून काम केल्याने जगाचा अनुभव कमी मिळतो. आवडीच्या क्षेत्रात काम करावे, तर वेतन किंवा मानधन तितकेसे मिळेलच याची खात्री नाही आणि जास्त वेतन मानधन मिळणारी नोकरी घेतली, तर त्यात आनंद वाटेलच असे नाही.

त्यामुळे आपल्याला नेमके काय हवे आहे? याचा विचार करून जीवनकार्य निवडावे लागेल. शिवाय संधीची उपलब्धता याही घटकाचा विचार करावा लागतोच. म्हणूनच स्वतःचे नीट निरीक्षण करा. मला काय हवे आहे? कमी पैसे मिळाले, तरी चालतील, पण आवडते क्षेत्र हवे आहे की, आधी पैसा हवा आहे मग आवड-निवडीला मुरड घालावी लागली तरी चालेल, याचा बाइकाईने विचार करायला हवा तरच क्षेत्र निवड अचूक होईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com