गरजांच्या पातळ्या

आपले जीवनकार्य निवडण्यापूर्वी आपल्याला आपल्या नेमक्या गरजा ओळखता आल्या पाहिजेत. अब्राहम मॅस्लो हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते.
physical needs
physical needssakal

आपले जीवनकार्य निवडण्यापूर्वी आपल्याला आपल्या नेमक्या गरजा ओळखता आल्या पाहिजेत. अब्राहम मॅस्लो हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी माणसांच्या गरजांची श्रेणीबद्ध मांडणी केली आहे. मॅस्लोंनी सांगितल्याप्रमाणे मानवी गरजा पाच प्रकारच्या असतात. अगदी सुरुवातीला पदानुक्रमाच्या तळाशी माणसाच्या मूलभूत किंवा शारीरिक गरजा असतात.

शुद्ध हवा, अन्न, पाणी, झोप अशा कोणत्याही प्राण्यासाठीही अत्यावश्यक ठरणाऱ्या गरजा आहेत. त्याशिवाय माणूस या प्राण्याचेही अस्तित्व असू शकत नाही. या पुढील स्तर म्हणजे सुरक्षा - सुरक्षा, सुव्यवस्था आणि स्थिरता. एखादे सुरक्षित घर असावे, जिथून आपल्याला कुणी हाकलून देणार नाही व इतर श्वापदांपासून संरक्षण मिळेल. आरोग्य बिघडलेच, तर त्यावर उपचारांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी.

एखादे स्थिर उत्पन्नाचे साधन असावे जेणेकरून आयुष्यात फार चढ-उतार येणार नाहीत. एखादे कुटुंब असावे ज्यात एकमेकांची काळजी घेतली जात असावी अशी अपेक्षा माणूस पहिली पायरी पूर्ण झाली की, करू लागतो. या दोन पायऱ्या व्यक्तीच्या शारीरिकदृष्ट्या जगण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

मानसिक गरजा

एकदा माणसांच्या मूलभूत गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र , निवारा आणि सुरक्षितता मिळाली, की तो आयुष्यात अधिक काही साध्य करण्याचा प्रयत्न सुरू करतो. गरजांचा तिसरा स्तर म्हणजे प्रेम आणि आपलेपणा. या मानसिक गरजा आहेत. जेव्हा स्वतःची शारीरिक सुरक्षिततेची गरज पूर्ण होते, तेव्हा माणसे इतरांसाठी काही तरी करायला तयार होतात. जसे की, कुटुंबातील सदस्य आणि चांगल्या मित्रांसोबत आपल्या वस्तू आणि भावना शेअर करणे. परस्परावलंबनाचे महत्त्व कळते व गरज सुरू होते. कुणीतरी आपले असावे व आपण कुणाचेतरी असावे असे वाटू लागते.

सन्मान पातळी

जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात काही तरी साध्य करावेसे वाटते किंवा आपण जे काही साध्य केले आहे त्याची समाजाने दखल घ्यावी असे वाटू लागते, तेव्हा चौथा स्तर गाठला जातो. या वेळी माणसाचा आत्मविश्वासही वाढलेला असतो. ही ‘सन्मान पातळी’ असते. यशाच्या पातळीनुसार आपल्याला सन्मान मिळावा व तसाच तो आपण दुसऱ्यांना द्यायलाही पाहिजे याची जाणीव या पातळीत असते.

आत्म-वास्तविकता

पिरॅमिडच्या सर्वांत वरती आत्म-वास्तविकता किंवा स्वतःची खरी ओळख ही पायरी आहे. या पायरीला तेव्हा पोहोचता येते, जेव्हा व्यक्तींना आत्मपरीक्षण करून त्यांना आपल्या क्षमता ओळखता आलेल्या असतात आणि ते त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यात गुंतलेले असतात. एकदा व्यक्ती आत्म-वास्तविक अवस्थेत पोहोचली की, ती स्वतःवर लक्ष केंद्रित करते आणि स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करते. निश्चित ध्येय साध्य करू शकते.

पहिल्या चार स्तरांना अत्यावश्यक गरजा म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ असा की, जर त्या चार गरजांपैकी एक पुरेशी नसेल, तर ती मिळवण्यासाठी व्यक्ती सर्वाधिक प्रयत्न करेल. त्याशिवाय अस्तित्वाचेच प्रश्न तयार होतात. अर्थार्जनाचे योग्य साधन निवडता आले पाहिजे व ज्यातून समाधान मिळेल असे कार्य करता आले पाहिजे.

वरील सर्व पायऱ्या या अगदी एकापाठोपाठच येतात असे नाही. काही वेळेला त्या समांतरसुद्धा चालू असतात. काही संत मंडळी, तर यांतील मधल्या पायऱ्या ओलांडून चटकन सर्वांत वरच्या पायरीवर पोहोचलेले दिसतात. आपल्याला मात्र या सर्व पातळ्यांचा आपल्या जीवनात समावेश असणार आहे असा विचार करून नियोजन करायला हवे.

या लेखात मॅस्लोच्या या पायऱ्यांबद्दल थोडक्यात लिहिले आहे. अधिक तपशिलासाठी त्यावर आधारित साहित्य अवश्य वाचा. लहान वयातच पुढील आयुष्याची आखणी करता यायला पाहिजे, नाही तर साध्य करायचे होते काही तरी वेगळेच आणि घडले वेगळे असे होण्याची दाट शक्यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com