
पुणे विभागातील या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुणे : राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे बाह्यस्त्रोतांद्वारे (आउट सोर्सिंग) करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. यासाठी महसूल विभागनिहाय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली आहे. या निर्णयानुसार पशुधन पर्यवेक्षकांची २६२ पदे बाह्यस्त्रोतांद्वारे भरली जाणार आहेत.
पुणे विभागातील या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह विभागीय सामाजिक न्याय अधिकारी, आदिवासी खात्याचे विभागीय अधिकारी आदींचा समावेश करण्यात आला आहे.
पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त हे या समितीचे सदस्य-सचिव असणार आहेत. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षकांची ७७६ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ३७८ पदे रिक्त आहेत. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोंबड्या आणि अन्य पक्षांना बर्ड फ्लू या विषाणूची लागण झाली आहे. यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून राज्यातील पशुपालकांना पशुस्वास्थविषयक सेवा पुरविण्यासाठी ही रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अव्वर सचिव समीर सावंत यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ही रिक्त पदे ११ महिन्यांच्या कालावधीसा कंत्राटी तत्त्वांवर भरण्यात येणार आहेत. यासाठी दरमहा प्रत्येकी १५ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. यामानधनाव्यतिरिक्त अन्य कोणतेही भत्ते किंवा सुविधा या कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांना दिल्या जाणार नसल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे. या रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचा आदेशही त्यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा